

अस्वस्थता अन् धुसफूस
एबी फॉर्मच्या निरोपाची इच्छुकांना प्रतीक्षा; उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २९ ः ठाणे महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता काही तासच हातात असताना अद्यापी एबी फॉर्मसाठी पक्षाकडून बोलवणे येत नसल्याने शेकडो इच्छुक अस्वस्थ झाले आहेत. शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये अशा इच्छुकांची संख्या सर्वाधिक आहे. युतीचे जागावाटप गुलदस्त्यात असल्याने यंदा आपल्याला संधी मिळेल की नाही, याची चिंता त्यांना सतावत आहे. दरम्यान, शिवसेना शिंदे गटात उमेदवारीमुळे अनेक प्रभागांमध्ये इच्छुकांचे शक्तिप्रदर्शन सुरूच असल्याचेही दिसून आले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने आखून दिलेल्या कार्यक्रमानुसार उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ३० डिसेंबर हा अखेरचा दिवस आहे. ठाण्यात शिवसेना शिंदे गट आणि भाजप अशी युती झाली आहे. ८७-४० असा सुरुवातीचा जागावाटपाचा फॉर्म्युला असल्याची चर्चा आहे; मात्र त्यावर महायुतीने शिक्कामोर्तब केले नसून उमेदवारांची यादीही सोमवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत जाहीर केली नव्हती. महायुतीच्या दोन्ही पक्षाने माजी नगरसेवकांना पहिले प्राधान्य दिल्याचे समजते. त्यानुसार काही माजी नगरसेवकांना निरोप धाडून एबी फॉर्म दिले गेले आहेत, पण तरीही एबी फॉर्मची प्रतीक्षा असणाऱ्या इच्छुकांची संख्या मोठी आहे. सोमवारी रात्री किंवा मंगळवारी सकाळपर्यंत अपेक्षित बोलावणे आले नाही, तर काय करायचे याची रणनीती आखली जात असल्याचे दिसते.
शिवसेना शिंदे गट आणि भाजप युतीला ठाण्यातूनही किंचित विरोध होत आहे. प्रतिनिधित्व करत असलेल्या दोन्ही पक्षांच्या प्रभागांमध्ये इच्छुकांनी संधीच्या अपेक्षेत काम केले होते. त्यामुळे नाराजांची मोठी फौज उभी राहत असल्याचे दिसते, तर दुसरीकडे वर्षानुवर्षे त्याच त्या चेहऱ्यांना संधी मिळत असल्याने नव्या दमाच्या इच्छुकांमध्येही नाराजी पसरली आहे. आगामी काळात स्वीकृत नगरसेवक किंवा समित्यांवर त्यांची वर्णी लावण्यात येईल, अशी समजूतही वरिष्ठाकडून काढली जात असल्याची माहिती मिळते.
नाराजीचे सूर
प्रभाग क्रमांक १, ५, ७ मधून सर्वाधिक नगरसेवक शिवसेनेचे निवडून आले हाते. भाजपला या तिन्ही जागांमध्ये वाटा हवा आहे. प्रभाग क्रमांक १ येथे एकमेव जागा खुल्या गटासाठी आहे. या जागेवर शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक सिद्धार्थ ओवळेकर यांनी दावा केला आहे. प्रभाग क्रमांक ५ मधून परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या पत्नी निवडणूक लढवणार आहेत; मात्र ठाकरे गटातून भाजपमध्ये दाखल झालेल्या रागिनी बैरीशेट्टी याही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. नौपाडा प्रभागात भाजपचे नगरसेवक आहेत. अशावेळी येथून दोन जागा मिळाव्यात यासाठी शिवसेना शिंदे गटाचे किरण नाकती आग्रही असून त्यांनी स्थानिकांच्या मदतीने शक्तिप्रदर्शन सुरूच ठेवले आहे. दरम्यान, महायुती धर्म म्हणून काही जागांवर तडजोड करण्याशिवाय पर्याय नाही, पण कार्यकर्त्यांना डावलून प्रस्थापितांच्या वारसांना संधी दिल्यास बंडाचे निशाण फडवण्याच्या तयारीत काही इच्छुक असल्याचे समजते.
मनसेची आघाडी
महाविकास आघाडीनेही आपली उमेदवार यादी जाहिर केलेली नाही. असे असले तरी एबी फॉर्म वाटपात मनसेने आघाडी घेतली आहे. सोमवारपर्यंत मनसेने २४ एबी फॉर्मचे वाटप केले असून, सात उमेदवार जाहीर केले आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवारांनीही अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे. महाविकास आघाडीमध्ये शिवसेना ठाकरे गट सर्वाधिक जागा लढणार आहे. उमेदवारी न मिळाल्यास ठाण्यात मोठ्या प्रमाणात बंडखोरी होण्याची शक्यता आहे. हे बंडखोर जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न ठाकरे गट करत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.