रसायणीत धोकादायक इमारतीत विद्यार्जन
रसायणीत धोकादायक इमारतीत विद्यार्जन
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न; शिक्षण विभागाच्या कारवाईकडे पालकांचे लक्ष
खालापूर, ता. २९ (बातमीदार) : रसायणी परिसरातील महिला उद्योग मंडळ संचलित शिशु विकास बाल मंदिर व प्राथमिक शाळा, मोहपाडा येथील तब्बल १, ३१२ विद्यार्थी धोकादायक अवस्थेतील इमारतीत शिक्षण घेत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. विद्यार्थ्यांच्या जीविताशी सुरू असलेला हा खेळ तत्काळ थांबवावा, अशी मागणी पालकांसह सामाजिक कार्यकर्ते अरुण गायकवाड यांनी केली आहे.
सुमारे ४५ वर्षांपूर्वी हिंदुस्तान ऑरगॅनिक केमिकल्समधील काही अधिकाऱ्यांच्या पत्नींनी सामाजिक उपक्रम म्हणून महिला उद्योग मंडळ, रसायणी या संस्थेची स्थापना केली होती. या संस्थेमार्फत शिक्षण क्षेत्रात योगदान देण्यासाठी ही शाळा सुरू करण्यात आली. आज ही शाळा खालापूर तालुक्यातील नामवंत शाळांपैकी एक मानली जाते. येथे इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग चालवले जातात. मात्र एवढी मोठी विद्यार्थीसंख्या असूनही शाळेची स्वतःची इमारत नाही, ही बाब चिंताजनक आहे. ही शाळा ६० टक्के अंशतः अनुदानित असून येथे प्रामुख्याने कष्टकरी, शेतकरी व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र विद्यार्थ्यांकडून भरमसाठ फी आकारली जात असल्याचे आरोप यापूर्वीही झाले आहेत. त्यातच, शासनाची परवानगी नसलेल्या मोहपाडा येथील प्रबळ वसतिगृहाच्या धोकादायक इमारतीत बेकायदा शाळा चालवली जात असल्याची तक्रार अरुण गायकवाड यांनी केली आहे. या इमारतीची स्थिती अत्यंत जीर्ण असून कोणत्याही क्षणी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करूनही अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याने पालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शिक्षण विभागाने तातडीने हस्तक्षेप करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी घ्यावी, अशी जोरदार मागणी होत आहे. मी संचालक मंडळावर आल्यानंतर विद्यार्थ्यांना फीच्या नावाखाली शिक्षणापासून वंचित ठेवले जात असल्याचे निदर्शनास आले. याबाबत विचारणा केल्यावर उडवाउडवीची उत्तरे मिळाली. इमारत अत्यंत धोकादायक आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शासनाने त्यांची इतर शाळांमध्ये व्यवस्था करावी, असे सामाजिक कार्यकर्ते व महिला उद्योग मंडळाचे कार्याध्यक्ष अरुण गायकवाड यांनी सांगितले.
..................
शाळेची इमारत धोकादायक असल्याचा अहवाल जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आला आहे. तक्रारदारांच्या अर्जावर मागील आठवड्यात सुनावणी झाली असून अहवालानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल, अशी मागणी प्रभारी गटशिक्षणाधिकारी दीपा परब यांनी दिले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

