बनावट तिकीट-पास रोखण्यासाठी मध्य रेल्वेचे ‘टीटीई अॅप’
बनावट तिकीट-पास रोखण्यासाठी मध्य रेल्वेचे ‘टीटीई ॲप’
एआयद्वारे फसवणूक; दोन महिन्यांत नऊ प्रकरणे उघड
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ : लोकलमधील प्रथम श्रेणी तसेच मेल-एक्स्प्रेस गाड्यांतील आरक्षित प्रवासासाठी बनावट तिकीट व पास वापरण्याचे प्रकार वाढू लागल्याने मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने कठोर पावले उचलली आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि ग्राफिक्स डिझाइनच्या सहाय्याने तयार होणाऱ्या बनावट तिकीट-पासवर आळा घालण्यासाठी ‘टीटीई ॲप’ विकसित करण्यात आले आहे.
मुंबईतील एसी लोकल तसेच सामान्य लोकलच्या प्रथम श्रेणीत बनावट तिकीट वापरून प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. काही प्रकरणांत गुन्हे दाखल झाले असले, तरी दैनंदिन प्रवासीसंख्या लक्षात घेता उघडकीस आलेली प्रकरणे ही केवळ हिमनगाचे टोक असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. एआयच्या मदतीने हुबेहूब दिसणारी तिकिटे तयार केली जात असल्याने पारंपरिक तपासणी पद्धती अपुऱ्या ठरत होत्या. या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने ‘टीटीई ॲप’ विकसित केले आहे. या ॲपद्वारे प्रवाशांकडील तिकीट किंवा पासचा क्रमांक टाकून त्याची वैधता तत्काळ तपासता येणार आहे. तसेच तिकिटांवरील क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर प्रवाशाची संपूर्ण माहिती उपलब्ध होणार आहे.
--------
मार्गदर्शक पुस्तिका आणि प्रशिक्षण
सतर्कता विभागाच्या मदतीने तयार करण्यात आलेल्या मार्गदर्शक पुस्तिकेत वैध आणि बनावट तिकीट-पास यातील फरक ओळखण्यासाठी सविस्तर सूचनांचा समावेश आहे. सर्व तिकीट तपासनिसांच्या मोबाईलमध्ये हे ॲप कार्यान्वित करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, यासाठी तीन प्रशिक्षण सत्रेही घेण्यात आली आहेत.
--------
दोन महिन्यांत नऊ प्रकरणे उघड
दरम्यान, एसी लोकलसह प्रथम श्रेणीत बनावट तिकीट-पास वापरण्याची प्रकरणे १५, २६ आणि २८ नोव्हेंबर तसेच ५ व २५ डिसेंबर रोजी उघडकीस आली. २८ नोव्हेंबर रोजी तीन, तर उर्वरित दिवशी प्रत्येकी एक अशी एकूण नऊ प्रकरणे नोंदवण्यात आली. या कारवाईत प्रवाशांसह तोतया तिकीट तपासनिसांनाही अटक करण्यात आली आहे. रेल्वेच्या विशेष तिकीट तपासणी पथकाने २२ आणि २६ डिसेंबर रोजी बनावट टीसींना रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले.
--------
तंत्रज्ञानातून फसवणुकीवर चाप
एआयच्या गैरवापरातून होणाऱ्या फसवणुकीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर सुरू करण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. ‘टीटीई ॲप’मुळे बनावट तिकीट-पासवर प्रवास करणाऱ्यांवर चाप बसेल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

