जागावाटपावरून चर्चेची गुऱ्हाळ सुरू
भिवंडी, ता. २९ (वार्ताहर) : भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात राज्यपातळीवर युतीची घोषणा झाली असली, तरी स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांच्या दबावामुळे अनेक ठिकाणी युतीच्या चर्चा अद्यापही सुरू असल्याचे चित्र आहे. भिवंडी महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप व शिंदे सेनेमध्ये जागावाटपावरून चर्चेची गुऱ्हाळ सुरू असल्याची माहिती भाजप शहराध्यक्ष रवी सावंत यांनी दिली.
२०१७ मध्ये झालेल्या भिवंडी निजामपूर शहर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजप स्वतंत्रपणे लढून १९ जागांवर, तर शिवसेनेने १२ जागांवर विजय मिळवला होता. त्या पार्श्वभूमीवर ज्या जागा पक्षाने जिंकल्या होत्या, त्याच पक्षाने जागा लढवाव्यात आणि उर्वरित आठ जागांपैकी दोन्ही पक्षांनी प्रत्येकी चार जागा लढवाव्यात, असा प्रस्ताव भाजपने शिंदे गटाकडे दिल्याचे रवी सावंत यांनी सांगितले. २०१७ च्या निवडणुकीत भाजपने पद्मानगर, ताडाळी, मानसरोवर, गौरीपाडा आणि नारपोली या भागांत विजय मिळवला होता, तर कामतघर, भादवड, टेमघर आणि नवी बस्ती या भागांत शिवसेनेने बाजी मारली होती. या निवडणुकीत दोन्ही पक्षांनी अनेक ठिकाणी एकमेकांचा पराभव केल्याने स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमध्ये चुरस निर्माण झाली होती. आगामी निवडणुकीत पुन्हा एकमेकांसमोर उभे राहण्यासाठी दोन्ही पक्षांतील मातब्बर नेते दोन वर्षांपासून तयारी करत आहेत. त्यामुळे या युतीच्या फॉर्म्युल्याला स्थानिक कार्यकर्त्यांची संमती मिळेल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. एकीकडे युतीच्या चर्चा सुरू असताना, दुसरीकडे कार्यकर्ते सोमवारी शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरण्याच्या तयारीत असल्याने भिवंडीतील राजकीय वातावरण तापल्याचे चित्र दिसत आहे.

