शेतकऱ्याची फसवणूक करणाऱ्यांना अटक
शहापूर, ता. २९ (वार्ताहर) : तालुक्यातील मुमरी धरणासाठी संपादित केलेल्या जमिनीच्या मोबदल्यापोटी मिळालेली रक्कम हडप करणाऱ्या तिघांना किन्हवली पोलिसांनी अटक केली आहे.
शहापूर तालुक्यातील भातसा प्रकल्पांतर्गत मुमरी धरणासाठी सरकारने शिदपाडा येथील शेतकरी हरी राम केवारी यांची १०५ गुंठे जमीन संपादित केली होती. या जमिनीच्या मोबदल्यापोटी सरकारकडून त्यांना ४५ लाख रुपयांची रक्कम मंजूर झाली होती. याबाबतची माहिती शरद केवारी, भारती केवारी आणि हरिलाल खोडका (रा. खरली) या तिघांना मिळाली. त्यांनी संगनमताने केवारी यांच्या अशिक्षित असल्याचा गैरफायदा घेतला. त्यांच्या परवानगीशिवाय आधार कार्ड, पॅन कार्ड व छायाचित्रे घेऊन परस्पर शहापूर येथील ॲक्सिस बँकेच्या शाखेत खाते उघडण्यात आले. खाते पुस्तिका, चेकबुक व एटीएम कार्ड आरोपींनी स्वतःकडेच ठेवले. ९ सप्टेंबर २०२४ मध्ये मोबदल्याची रक्कम या बँक खात्यात जमा झाल्यानंतर आरोपींनी ११ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबरदरम्यान आरटीजीएस व एटीएमद्वारे रक्कम काढून घेतल्याचे तपासात उघड झाले आहे.
वडिलांची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच हरी केवारी यांची मुलगी हर्षला काशिनाथ मेंगाळ यांनी ३० जून २०२५ मध्ये किन्हवली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. गुन्हा दाखल होऊ नये, यासाठी आरोपींनी केवारी यांना सात लाख ७९ हजार रुपये परत केले. मात्र, उर्वरित ३७ लाख ४४ हजार ६०५ रुपये परत न मिळाल्याने पोलिसांनी तिघा आरोपींना अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास किन्हवली पोलिस करीत आहेत.

