हेटवणे जलवर्धन प्रकल्पातील पहिल्या बोगद्याचा ब्रेकथ्रू यशस्वी
‘हेटवणे’तील पहिल्या बोगद्याचा ब्रेकथ्रू यशस्वी
सिडकोच्या शिरपेचात आणखी एक तुरा : विजय सिंघल
नवी मुंबई, ता. २९ (वार्ताहर) : पेण तालुक्यातील हेटवणे धरणापासून प्रक्रियाविरहित (कच्चा) व जलशुद्धीकरण केंद्रापासून प्रक्रियायुक्त (शुद्ध) पाण्यासाठी एकूण २९ किमी लांबीचे दोन भिन्न बोगदे बनविण्याचे काम सिडकोद्वारा प्रगतिपथावर असून, त्यापैकी ॲफकॉन्स कंपनीद्वारा खोदण्यात आलेल्या ५.५२ किमी लांबीच्या (शाफ्ट ३ आणि ४ दरम्यान) बोगद्याचा पहिला ब्रेकथ्रू सोमवारी (ता. २९) सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
सिडको आणि नैना क्षेत्रातील भविष्यातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन सिडकोने हेटवणे जलवर्धन योजनेच्या कामाला गती दिली आहे. अत्यंत कठीण भूगर्भीय व अभियांत्रिकी आव्हानांवर मात करत पहिला बोगदा ब्रेकथ्रूमुळे सिडकोने नवा इतिहास रचला आहे. सिडकोच्या आजवरच्या सर्व प्रकल्पांमध्ये हा पहिलाच बोगदा ब्रेकथ्रू ठरला आहे. या वेळी झालेल्या कार्यक्रमस्थळी सहव्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख, मुख्य अभियंता शीला करूणाकरन, अधीक्षक अभियंता (पाणीपुरवठा) प्रवीण सेवतकर यांच्यासह सिडको व ॲफकॉन्सचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवी मुंबई परिसरातील विकसित होत असलेल्या भागांची वाढती पाण्याची गरज भागवण्यासाठी सिडकोने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. या योजनेत १३.२५ किलोमीटर लांबीचा कच्च्या पाण्याचा बोगदा तसेच १५.४ किलोमीटर लांबीचा शुद्ध पाण्याचा बोगदा उभारण्यात येत आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर सिडकोची जलपुरवठा क्षमता सध्याच्या १५० दशलक्ष लिटर प्रतिदिनवरून २७० दशलक्ष लिटर प्रतिदिन इतकी वाढणार असल्याचे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी सांगितले. हा टप्पा गाठताना सिडकोचे अभियंते आणि ॲफकॉन्सच्या टीमने अनेक भूगर्भीय, अभियांत्रिकी व इतर आव्हानांवर मात केली आहे. बोगदा खोदण्याचे काम जमिनीखाली सुमारे १०० मीटर खोलीवर करण्यात येत आहे. बोगद्याचा मार्ग सह्याद्री पर्वतरांगांतील बेसॉल्ट सारख्या गुंतागुंतीच्या खडकातून जातो. मर्यादित जागेमुळे यंत्रसामग्री उभारणी व हालचालींमध्ये अडचणी येत होत्या, तसेच उत्खननातून निघालेला मलबा आणि त्याची गाडीतून वाहतूक करून तो बाहेर आणणे अशा प्रकारच्या बोगद्यात सर्वात आव्हानात्मक काम होते. सिडको अभियंते व ॲफकॉन्स टीमच्या समन्वयामुळे या सर्व अडचणींवर यशस्वीपणे मात करण्यात आल्याचे सिंघल म्हणाले.
..
उर्वरित काम पूर्ण वेळेत
कच्चा पाण्याचा १३.२५ किमीचा बोगदा मेघा इंजिनिअरिंग द्वारा उभारण्यात येत आहे, तर १५.४ किमी लांबीच्या शुद्ध पाण्याचा बोगदा ऍफकॉन्स व पटेल इंजिनिअरिंग या दोन कंपन्यांद्वारे उभारण्यात येत आहे. यापैकी ॲफकॉन्सद्वारा ५.५२ किमी बोगद्याचे काम पूर्ण करण्यात आले असून, या बोगद्याचा ब्रेकथ्रू वहाळ गावातील शाफ्ट क्रमांक ४ येथे सोमवारी करण्यात आला. उर्वरित बोगदा खोदण्याचेकामदेखील नियोजित वेळेत पूर्ण करण्यात येणार आहे. यामुळे नवी मुंबईला वाढीव पाणीपुरवठा करण्याकरिता मदत होणार असल्याचे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

