औद्योगिक वसाहतीत ‘वाहतूक संकट’
औद्योगिक वसाहतीत ‘वाहतूक संकट’
प्रलंबित वाहनतळ आणि बेशिस्त पार्किंगमुळे अपघातांचे सत्र; प्रशासनाचे दुर्लक्ष
बोईसर, ता. ३० (वार्ताहर) : रापूर औद्योगिक वसाहतीमध्ये सुसज्ज वाहनतळाचा अभाव आणि रस्त्यांवर होणाऱ्या अनधिकृत पार्किंगमुळे संपूर्ण वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. या परिसरात शाळा, महाविद्यालये आणि रुग्णालयांची मोठी संख्या असून, दररोज हजारो विद्यार्थी, कामगार व नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ट्रक टर्मिनलचा प्रस्ताव लालफितीत अडकल्याने हे ‘वाहतूक संकट’ अधिक गडद झाले आहे.
तारापूर एमआयडीसीमध्ये सुमारे १,२०० कारखाने सुरू आहेत. जिंदाल, विराज, टाटा स्टील यांसारख्या मोठ्या उद्योगांतून दररोज शेकडो अवजड वाहने धावतात; मात्र अधिकृत पार्किंग नसल्याने ही वाहने मुख्य रस्त्यांच्या कडेलाच उभी केली जातात. यामुळे रस्ते अरुंद झाले असून, पादचारी आणि दुचाकीस्वारांना थेट मुख्य रस्त्यावरून चालावे लागते. परिणामी, येथे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अवजड वाहनांच्या सततच्या वर्दळीमुळे ध्वनिप्रदूषण वाढले असून, उत्सर्जित होणाऱ्या धुरामुळे वायुप्रदूषणाची पातळीही उंचावली आहे. कामाच्या शिफ्ट बदलण्याच्या वेळी या वाहनांची बेशिस्त अधिक वाढते, ज्याचा थेट फटका कामगारवर्गाला बसत आहे. अरुंद रस्त्यांवर अवजड वाहनांची गर्दी वाढल्याने लहान वाहनांना व दुचाकींना अडथळा ठरत आहे. वेगमर्यादा नसल्याने भरधाव ट्रक चालवले जातात. अवजड वाहने सतत हॉर्न वाजवत असल्याने ध्वनिप्रदूषण तर वाहनातील धुरामुळे वायुप्रदूषण होत आहे. त्यामुळे मानवी आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
-------------
आकडेवारी
कारखान्यांची संख्या : १,२०० हून अधिक
दैनंदिन वाहनांची वर्दळ : सुमारे ७,२००
महिन्याकाठी हालचाल : २,१६,००० वाहने
वर्षाकाठी वर्दळ : २५ लाखांहून अधिक वाहने
-------------
नागरिकांच्या प्रमुख मागण्या
- पीक अवर्स आणि शिफ्ट ड्युटीच्या वेळी अवजड वाहनांना प्रवेशबंदी करावी.
- रस्त्यावरील अनधिकृत पार्किंगवर कठोर कारवाई करून वाहने जप्त करावीत.
- एमआयडीसी आणि वाहतूक पोलिसांनी संयुक्त नियमावली जाहीर करावी.
- प्रलंबित ट्रक टर्मिनलचे काम युद्धपातळीवर पूर्ण करावे.
-------------
पश्चिम रेल्वेच्या कामामुळे पूर्वीचा ‘एम-३७’ भूखंड बदलून आता ‘ओएस-१/ए’ या २० हजार चौ.मी. भूखंडावर वाहनतळ प्रस्तावित केला आहे. सुमारे ९.५४ कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवला असून, संपूर्ण जागेचा वापर वाहनतळासाठी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यावर कंत्राटदाराद्वारे याचे नियोजन केले जाईल.
- अविनाश संखे, उपअभियंता, एमआयडीसी, तारापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

