धोकादायक पुलावरून अवजड वाहनांची वाहतूक

धोकादायक पुलावरून अवजड वाहनांची वाहतूक

Published on

भरत उबाळे : सकाळ वृत्तसेवा
शहापूर, ता. ३१ : तालुक्यातील सावरोली (खु.) गावाजवळ तानसा नदीवरील पुलाला जूनमधील अतिवृष्टीदरम्यान तडे गेल्याने तो रहदारीसाठी धोकादायक ठरल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने जाहीर केले आहे. असे असतानाही या पुलावरून अवजड वाहनांची वाहतूक अद्याप सुरूच असल्याने संभाव्य अपघाताचा धोका वाढला आहे. ही वाहतूक तातडीने बंद करण्याची मागणी जोर धरत आहे.
अवजड वाहतूक रोखण्यासाठी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडून अधिसूचना जारी होणे आवश्यक असतानाही अद्याप ती प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शहापूर उपविभागाने यासंदर्भात प्रस्ताव सादर केला, तरी तो मंजुरीअभावी प्रलंबित आहे. परिणामी, अवजड वाहनांवर कायदेशीर अडथळा आणण्यात अडचणी निर्माण होत असून धोकादायक पुलावरून वाहतूक सुरू राहिली आहे. ५७ क्रमांकाच्या प्रमुख जिल्हा मार्गावर असलेला हा पूल वासिंद, पिवळी, दहागाव, वांद्रे, कोशिंबडे, वेहलोंढे, सावरोली तसेच भिवंडी तालुक्यातील मैंदे, केल्हे आणि पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील जाळे, खैरे, आंबिवली, कांबारे आदी गावांना जोडतो. पुलाला तडे गेल्यामुळे तो अपघातप्रवण बनला असून अवजड वाहनांमुळे त्याची स्थिती आणखी गंभीर झाली आहे. सहा महिने उलटूनही दुरुस्ती न झाल्याने या मार्गावर अवलंबून असलेल्या वीटभट्टी व्यवसाय, भातशेती, वनउपज वाहतूक व इतर ग्रामीण व्यवसाय अडचणीत सापडले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांची अधिसूचना नसल्याने अवजड वाहतूक रोखण्यात प्रशासन अपयशी ठरत आहे. वेळेत निर्णय न झाल्यास या तडे गेलेल्या पुलामुळे अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे.


हाइट बॅरिअर्सचे नुकसान
१६ जूनला पुलाला तडे गेल्याची माहिती समोर आल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने पाहणी करून खबरदारी म्हणून तात्पुरती वाहतूक बंद केली होती. अधिक्षक व कार्यकारी अभियंत्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. तसेच स्ट्रक्चरल ऑडिटसाठी क्षेत्रीय तपासणी करण्यात आली. सल्लागारांनी पुलावरील अवजड वाहतूक कायमस्वरूपी बंद करण्याची शिफारस केली होती. अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुलाच्या दोन्ही बाजूंना हाइट बॅरिअर्स बसविण्यात आले; मात्र अवजड वाहनांकडून या बॅरिअर्सची वारंवार तोडफोड होत असल्याचेही निदर्शनास आले आहे.


सावरोली (खु.) पुलावरील अवजड वाहतूक बंद करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत अधिसूचना प्रसारित करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. अधिसूचना जारी झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल.
- बी. आर. कांबळे, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, शहापूर

शहापूर : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी धोकादायक सावरोली (खु.) पुलाची पाहणी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com