येऊरमध्ये जल्लोषाला लगाम

येऊरमध्ये जल्लोषाला लगाम

Published on

येऊरमध्ये जल्लोषाला लगाम
पार्ट्यांवर पोलिसांची ‘वॉच’
ठाणे, ता. ३० : सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी येऊरच्या निसर्गरम्य परिसरात होणाऱ्या जल्लोषाला ठाणे पोलिसांनी लगाम घातला आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग असलेल्या येऊर परिसरात ध्वनी प्रदूषण आणि अनधिकृत पार्ट्या रोखण्यासाठी पोलिसांनी कडक पावले उचलली असून, परिसरातील फार्महाउस आणि हॉटेलमालकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. वर्तकनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण माने यांनी भारतीय नागरी सुरक्षा संहिता कलम १६८ नुसार परिसरातील अनधिकृत बंगले, फार्महाउस, लॉन्स, हॉटेल्स आणि टर्फधारकांना नोटिसा दिल्या आहेत. यामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे, की नियमांचे उल्लंघन झाल्यास ही नोटीस न्यायालयात पुरावा म्हणून वापरली जाईल आणि संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, मधुबन-येऊर प्रवेशद्वारातून सायंकाळी ६ ते सकाळी ७ वाजेपर्यंत सर्वसामान्यांना प्रवेश बंद राहील; मात्र यामध्ये स्थानिक रहिवासी, एअर फोर्स अधिकारी आणि कार्डधारकांना यातून सूट असेल. येऊरचा निसर्ग आणि वन्यजीवांचे संरक्षण करणे हे आमचे कर्तव्य आहे. विनापरवाना पार्ट्या किंवा गोंधळ घालणाऱ्या आयोजकांवर आणि व्यवस्थापकांवर तत्काळ गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण माने यांनी दिला आहे.

वन्यजीव आणि निसर्ग संरक्षणाला प्राधान्य
येऊर परिसर हा केंद्र सरकारने ‘ईको-सेन्सिटिव्ह झोन’ आणि शांतता क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. फटाके आणि मोठ्या आवाजामुळे येथील वन्यजीवांना त्रास होतो, ही बाब लक्षात घेऊन पोलिसांनी सुरक्षेसाठी सोमवारी सायंकाळपासूनच मुख्य प्रवेशद्वारावर कडक पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.

या बाबींवर कडक बंदी
विनापरवाना पार्ट्या : कोणत्याही अधिकृत परवानगीशिवाय आयोजित केलेल्या कार्यक्रमांवर बंदी
ध्वनिप्रदूषण : लाऊड स्पीकर, साउंड सिस्टीम आणि फटाक्यांच्या वापरावर पूर्णपणे रोख
लेझर शो आणि ड्रोन : एलईडी/रेझर लाइट आणि विनापरवाना ड्रोन शूटिंगला परवानगी नाही.

Marathi News Esakal
www.esakal.com