डहाणूत पती–पत्नीने उभारला ओरिजनल मधाचा ‘विपानि बी हाऊस’ ब्रँड
नैसर्गिक मधाचे ‘विपानी बी हाऊस’
डहाणूतील दाम्पत्याने नोकरी सोडून निवडला मधमाशीपालनाचा मार्ग
वाणगाव, ता. ३० (बातमीदार) : मुंबई विद्यापीठातून फाइन आर्टमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या डहाणूतील विनय आणि निकिता पाटील या दाम्पत्याने नोकरीतील अनिश्चितता बाजूला सारून मधमाशीपालनात आपला स्वतंत्र ठसा उमटवला आहे. केवळ दोन पेट्यांपासून सुरू झालेल्या या प्रवासाचे रूपांतर आज ‘विपानी बी हाऊस’ या प्रसिद्ध ब्रँडमध्ये झाले असून, शुद्ध मधासोबतच ते आता प्रशिक्षणाचेही केंद्र बनले आहे.
कोरोना काळात आरोग्याचे महत्त्व वाढल्याने विनय पाटील यांनी कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड येथे प्रशिक्षण घेतले. पत्नी निकिताच्या बचतीतून दोन मधू वसाहती खरेदी करून या व्यवसायाचा श्रीगणेशा झाला. आज त्यांच्याकडे सातेरी आणि कोती (डंखरहित) जातीच्या अनेक वसाहती असून, वार्षिक १०० किलो नैसर्गिक मधाची विक्री ते करीत आहेत. फाइन आर्टसच्या पार्श्वभूमीमुळे पाटील दाम्पत्याने मधमाश्यांसाठी स्वतः कलात्मक लाकडी आणि मातीच्या पेट्या तयार केल्या आहेत. त्यावर जैवविविधता दर्शवणारी चित्रे काढली असून, ही या ब्रँडची खास ओळख बनली आहे. मेणपतंग नियंत्रणासाठी त्यांनी विकसित केलेला सापळा इतर मधुपालकांसाठीही फायदेशीर ठरत आहे. निसर्गातील परागीकरणाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे, यासाठी शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी एकदिवसीय शैक्षणिक कॅम्प आयोजित केले जातात. नैसर्गिक शेतीसाठी मधमाशी हा महत्त्वाचा घटक आहे. मधमाशीचे महत्त्व शालेय स्तरापासूनच विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे ही काळाची गरज आहे, असे पाटील दाम्पत्य सांगतात. शिक्षणातून अनुभव आणि अनुभवातून प्रेरणा देणारा हा उपक्रम डहाणू तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे.
-------------
‘मध शाळा’ आणि सामाजिक कार्य
विनय पाटील यांनी पंजाब कृषी विद्यापीठ आणि खादी ग्रामोद्योगमधून प्रगत प्रशिक्षण पूर्ण केले आहे. सध्या ते प्रशिक्षक म्हणून आदिवासी तरुणांना मार्गदर्शन करीत आहेत. ‘विपानी बी हाऊस’मध्ये दरमहा ‘मधशाळा’ भरवली जाते, ज्याची तिसरी आवृत्ती १० व ११ जानेवारी रोजी होणार आहे. स्थानिक मधुपालकांना संघटित करण्यासाठी त्यांनी ‘Honey Bee We CAN’ या गटाचीही स्थापना केली आहे. ‘CAN’ म्हणजेच चिखला, आगर व नरपड परिसरातील मधुपालक. या गटाच्या माध्यमातून नियमित भेटी, अनुभवांची देवाणघेवाण, अडचणींवर उपाय, नवे प्रयोग व नवोदित मधुपालकांना प्रत्यक्ष मार्गदर्शन केले जाते. या ग्रुपमधून सातत्याने मिळणारे प्रोत्साहन व सामूहिक बळ हे आपल्या वाटचालीसाठी महत्त्वाचे असल्याचे विनय पाटील सांगतात.
-------------
पुढील टप्प्यात स्वतःच्या फार्मवर मधमाशी पर्यटन सुरू करण्याचा मानस असून, त्यादृष्टीने हळूहळू लँड डेव्हलपमेंटचे काम सुरू आहे. मधमाशी वाचवणे, पर्यावरण संतुलन राखणे आणि भावी पिढीत निसर्गपूरक दृष्टी निर्माण करणे हे अंतिम ध्येय गाठण्यासाठी वाटचाल सुरू आहे.
- विनय पाटील, युवा मधुपालक, डहाणू

