सत्तेची सूत्र महिलांच्या हाती यावीत!
सत्तेची सूत्र महिलांच्या हाती यावीत!
राष्ट्रीय गणतंत्र पार्टीची आग्रही भूमिका
मुंबई, ता. ३० : पंतप्रधान, मुख्यमंत्री अशा महत्त्वाच्या पदांना आरक्षणाचे नियम लागू करण्याच्या मागणीसाठी राज्यासह देशभरात त्या आरक्षणाची चळवळ चालविणाऱ्या राष्ट्रीय गणतंत्र पार्टीने मुंबई महापालिकेत राष्ट्रीयत्व तसेच बंधुभावाची भावना प्रकट करणाऱ्या पुरोगामी पक्षांच्या बाजूने उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून, तिच्या पालकत्वाची म्हणजेच महापौर पदाची सूत्रे महिलेच्या हाती असावीत, इथे अधिकाधिक महिलांनी नेतृत्व करावे, यासाठी पार्टीने अशा पुरोगामी विचारांच्या महिला उमेदवारीला मदत करण्याची भूमिका घेतली आहे. यासोबत जे पक्ष महापालिकेची निवडणूकही ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यासाठी आग्रही राहतील, त्यांनाही विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर पाठिंबा दर्शविला जाणार आहे.
ईव्हीएम हटाव देश बचाव आणि पंतप्रधान, मुख्यमंत्री अशा पदांना आरक्षणाच्या चौकटीत बसवण्यासाठी राष्ट्रीय गणतंत्र पार्टी काम करीत असून, मुंबईत या पार्टीला पाठिंबा देणारा मोठा मतदार वर्ग आहे. यात प्रामुख्याने विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ, विचारवंत, साहित्यिक, संशोधकांचाही मोठा सहभाग असून, पक्षाकडून सोशल मीडियावर मुंबईतील विविध प्रश्नांसोबत देशातील प्रश्नांवर मोहीम चालवली जाते. महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मान्यवर कांशीराम आदींच्या विचारांतून प्रेरणा घेतलेल्या राष्ट्रीय गणतंत्र पार्टीचे मुंबईतील अनेक ठिकाणी मतदार आहेत.
ईव्हीएम आणि पंतप्रधान पदाच्या आरक्षणाच्या लढ्यात या मतदारांकडून वेळोवेळी पक्षाला पाठिंबा मिळत असतो. पार्टीने राजकीय विचारांसाठी एक शिस्त लावून घेतली असून, राज्यभरात आणि राज्याबाहेर पार्टीकडून काही महत्त्वाच्या मुद्द्यावरच चर्चा, आंदोलन, सोशल मीडियावर आपली भूमिका जाहीर केली जात असल्याचे पार्टीचे अध्यक्ष प्रल्हाद गवारे यांनी सांगितले.
देशात मागील १४ वर्षांनंतर विविध समाजघटकांमध्ये दुहीचे वातावरण निर्माण केले जात आहे. तेच वातावरण मुंबई महापालिका निवडणुकीतही निर्माण केले जाणार असून, ही खूप गंभीर बाब आहे. यामुळे या निवडणुकीत भारताने जगाला जी विश्वबंधुत्वाची शिकवण दिली, तीच शिकवण प्रत्येक नागरिकामध्ये रुजली पाहिजे, यासाठी मुंबईकरांना ही शिकवण निवडणूक प्रचारात आम्ही देणार असल्याचेही गवारे यांनी सांगितले.
पुरोगामी विचारांना पाठिंबा
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत आपल्या पार्टीकडून एकही उमेदवार न देता केवळ पुरोगामी विचारांशी बांधील असलेल्या उमेदवारांना स्वत:हून मदत करणार आहोत. मुंबईत पर्यावरण, नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधा यापेक्षा मतदानांसाठी जागरूक करणे, त्यांना आरक्षण हक्कांची जाणीव करून देणे याला पार्टीने प्राथमिकता दिली आहे. त्याचाच भाग म्हणून मुंबईतील विविध मतदारसंघांत उमेदवारांची ताकद, विचारधारा इत्यादी लक्षात घेऊन त्याला पाठिंबा दर्शविला जाणार असल्याचेही पार्टीचे अध्यक्ष गवारे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

