मुंबईत शिवसेनेचा अस्तित्त्वाचा लढा

मुंबईत शिवसेनेचा अस्तित्त्वाचा लढा

Published on

मुंबईत शिवसेनेचा अस्तित्वाचा लढा
ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे पालिका टिकवणार का?; भाजपच्या वाढत्या प्रभावाचे आव्हान
सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. ३० : मुंबई व ठाकरेंची शिवसेना हे एकमेकांपासून वेगळे करणे अशक्य आहे. १९ जून १९६६ रोजी एका सामाजिक चळवळीतून जन्मलेल्या शिवसेनेने मुंबई महापालिकेच्या सत्तेपर्यंत मारलेली झेप ही भारतीय राजकारणातील एक अभूतपूर्व घटना आहे; मात्र ५८ वर्षांच्या या प्रवासात मुंबईचा आवाज ठरलेल्या उद्धव ठाकरे यांचा पक्ष आज अस्तित्वाची लढाई लढतोय. दोन दशकानंतर राज-उद्धव हे ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे मुंबईत ठाकरेंचा आवाज राहणार का, हा प्रश्न आहे.

मराठी अस्मितेचा एल्गार
​शिवसेनेचा जन्मच मुळी ‘मराठी माणूस’ आणि ‘भूमिपुत्रांचे हक्क’ या मुद्द्यावर झाला. १९६८ मध्ये पहिल्यांदा पालिका निवडणूक लढवताना शिवसेनेने मुंबईच्या गल्लीबोळात ‘मराठी टक्का’ जागृत केला. पहिल्याच निवडणुकीत ४२ जागा जिंकून शिवसेनेने प्रस्थापित काँग्रेसला धोक्याचा इशारा दिला. १९७० आणि ८०च्या दशकात शिवसेनेने गिरणी कामगारांच्या समस्या आणि स्थानिक रोजगाराच्या मुद्द्यावर आपली पकड मजबूत केली. १९८५ मध्ये शिवसेनेने पहिल्यांदा पालिकेत स्वबळावर सत्ता काबीज केली, ज्याने खऱ्या अर्थाने मुंबईवर ‘ठाकरे’ पर्वाची सुरुवात झाली.

​सत्तेचा सुवर्णकाळ आणि कामगिरी
​९०च्या दशकात शिवसेनेने ‘मराठी अस्मिते’सोबत ‘हिंदुत्वा’ची जोड दिली. त्‍यामुळे त्यांचा मतदारवर्ग विस्तारला. पालिकेतील कामगिरीबद्दल बोलायचे झाल्यास, ​आरोग्य आणि शिक्षण यावर त्यांनी दिलेला भर, केईएम, सायन यांसारख्या रुग्णालयांचे जाळे आणि पालिका शाळांद्वारे गरिबांपर्यंत पोहोचणे ही शिवसेनेची जमेची बाजू ठरली. शिवसेनेने मुंबईत शाखांचे नेटवर्क बांधले, या शाखा स्थानिकांसाठी तक्रार निवारण केंद्र बनले. यामुळे मुंबईकराचे शिवसेनेसोबत भावनिक नाते तयार झाले. १९९७ मध्ये शिवसेनेने मुंबई पालिकेत १०३ जागा जिंकत यशाचे शिखर गाठले होते; मात्र त्यानंतर यशाचा हा आलेख घसरत गेला.

आतापर्यंतची पालिका निवडणुकीत शिवसेनेची कामगिरी
निवडणूक वर्ष- शिवसेनेच्या जागा, मतांची टक्केवारी
१९९७ १०३ ३१ टक्‍के
२००२ ९७ २७ टक्‍के
२००७ ८४ २३.५ टक्‍के
२०१२ ७५ २२ टक्‍के
२०१७ ८४ ३७ टक्‍के

​भाजपसोबतची युती व संघर्ष
​१९८९ पासून शिवसेना-भाजप युती ही अभेद्य मानली जात होती. युतीमुळे हिंदुत्ववादी मते विभागली गेली नाहीत, ज्याचा सर्वाधिक फायदा शिवसेनेला सत्ता टिकवण्यासाठी झाला; मात्र २०१४ नंतर राष्ट्रीय राजकारणात भाजपची ताकद वाढली आणि त्याचे पडसाद मुंबईत उमटले. २०१७ मध्ये युती तोडून स्वतंत्र लढल्यामुळे भाजप आता मित्रपक्ष राहिलेला नसून राजकीय स्पर्धक ठरल्याचे पहिल्यांदा शिवसेनेच्या लक्षात आले. युती तोडल्यामुळे अमराठी मते भाजपकडे वळली, शिवसेनेच्या घसरणीचे ते एक मुख्य कारण होते.

मराठी मतांचे विभाजन
​२००६ मध्ये राज ठाकरेंनी शिवसेना सोडल्यामुळे २००७ व २०१२च्या निवडणुकीत मराठी मते विभागली गेली. त्याचा राजकीय फटका शिवसेनेला बसला. २०१२ मध्ये मनसेने २७ जागा जिंकल्या. आपला भूतकाळ गाडून ठाकरे बंधू या वेळी एकत्र आले आहेत.

​अस्तित्वाची लढाई
​२०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेचे दोन तुकडे झाले. ‘धनुष्यबाण’ चिन्ह आणि ‘शिवसेना’ नाव शिंदे गटाकडे गेल्याने ठाकरे गटासमोर मोठे संकट उभे राहिले आहे. मुंबई पालिकेतील अनेक माजी नगरसेवकांनी शिंदे यांची सोबत केल्यामुळे संघटनेची ताकद कमी झाली. महाविकास आघाडीच्या माध्यमातून लोकसभेत मिळवलेले यश मात्र विधानसभेत टिकवता आले नाही. शिवसेनेचे विधानसभेत २० आमदार निवडूण आले. त्यापैकी १० आमदार मुंबईतले आहेत. पक्ष अजूनही मुंंबईत तग धरून आहे. ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे शिवसेनेला पालिका टिकवण्यात यश मिळेल का, हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होईल.

शिवसेनेची खरी ओळख मराठी अस्मिता हीच आहे. मध्यंतरी त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा पकडून आपला पक्ष महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या बाहेर वाढण्याचा प्रयत्न केला; मात्र भाजपनेदेखील याच मुद्द्याला हात घातल्याने शिवसेनेला त्यात फारसे यश आले नाही. त्‍यामुळे आता मराठीच्या मुद्द्याकडे ठाकरे बंधू पुन्हा एकदा सोबत आले आहेत.
- हेमंत देसाई, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक

मराठीच्या मुद्द्यावर दोन्ही ठाकरे एकत्र आल्याने मराठी मतांचे विभाजन काही प्रमाणात नक्कीच टळेल; मात्र ते निर्णायक ठरेल का, हा प्रश्नच आहे. काँग्रेससोबत नसण्याचा काय फटका बसेल, हेही बघावे लागेल.
- अभय देशपांडे, राजकीय विश्लेषक

शिवसेनेचा मुंबईतील प्रवास हा नेहमीच मराठी अस्मिता आणि हिंदुत्व या भावनिक मुद्द्यांवर आधारलेला राहिला आहे; मात्र १९९७ नंतर जागांच्या संख्येत झालेली घसरण हे दर्शवते की केवळ भावनांवर सत्ता टिकवता येत नाही. आताची निवडणूक शिवसेनेच्या ‘अस्तित्वाची’ अंतिम चाचणी असेल.
- प्रा. सुमीत म्हसकर, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com