महायुतीची अखेर स्वतंत्र चूल!

महायुतीची अखेर स्वतंत्र चूल!

Published on

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ३० : शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्या महायुतीबाबत गेले अनेक दिवस सुरू असलेल्या चर्चेला अखेर आज (ता. ३०) पूर्णविराम मिळाला. दोन्ही पक्षांकडील नेत्यांचे जागावाटपावर एकमत न झाल्याने अखेर शिवसेना आणि भाजपच्या उमेदवारांनी पक्षाच्या एबी फॉर्मसह उमेदवारी अर्ज भरले. शिंदे गटाच्या तुलनेत भाजपमध्ये अभूतपूर्व गोंधळाचे चित्र होते. बेलापूर मतदारसंघात भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश पाटील हे संपर्काबाहेर गेल्यामुळे आमदार मंदा म्हात्रे समर्थकांना उमेदवारीला मुकावे लागल्याने मोठा गोंधळ उडाला.

नवी मुंबई महापालिकेच्या इतिहासातील सर्वात मोठा आणि अभूतपूर्व गोंधळ आज पाहायला मिळाला. गेले अनेक दिवस महायुतीच्या सुरू असलेल्या चर्चेच्या नाट्यावर पडदा पडला. भाजप आणि शिंदे गटाचे १११ जागांच्या वाटपावर एकमत न झाल्यामुळे महायुती तुटली. याबाबत दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी अधिकृतरीत्या घोषणा करणे टाळले, तरीसुद्धा इच्छुक कार्यकर्त्यांनी नेत्यांच्या घरी आणि कार्यालयात जाऊन गोंधळ घातला. ऐरोलीपेक्षा सर्वाधिक जास्त गोंधळ बेलापूर विधानसभा मतदारसंघात झालेला पाहायला मिळाला. वनमंत्री गणेश नाईक यांच्याविरोधात निवडणूक लढवणाऱ्या शिवसेनेच्या ऐरोलीत माजी नगरसेवकांच्या उमेदवारीला भाजपने विरोध केल्यामुळे महायुती होऊ शकली नाही.

सकाळी युती होत नसल्याचे लक्षात येताच ज्या उमेदवारांनी एबी फॉर्मशिवाय अर्ज भरला होता, त्यांनी तत्काळ एबी फॉर्म घेण्यासाठी जिल्हाध्यक्षांच्या घरी आणि कार्यालयात गर्दी केली होती. वाशीमध्ये शिंदे सेनेचे जिल्हाध्यक्ष किशोर पाटकर यांच्या मध्यवर्ती कार्यालयात उमेदवारांनी गर्दी केली होती, तर भाजपने वाशी, नेरूळ या भागात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि ठाकरे गटातून माजी नगरसेवकांना उमेदवारी दिली. आज ऐरोली आणि बेलापूर विधानसभा मतदारसंघातील सर्व २८ प्रभागांतील जागांवर शिवसेनेचे दोन्ही गट, भाजप, काँग्रेस, मनसे, राष्ट्रवादी शरद पवार आणि अजित पवार गटातर्फे उमेदवारी अर्ज भरण्यात आले.

अखेरच्या क्षणी उलथापालथ
काँग्रेस आणि ठाकरे गटाने महाविकास आघाडी करून नवी मुंबई महापालिका निवडणूक लढत आहेत. शिवसेनेचे नगरसेवक विशाल ससाणे हे ज्या ठिकाणी इच्छुक होते, त्या जागेवर आरक्षणामुळे काँग्रेसचे प्रवक्ते रवींद्र सावंत हेसुद्धा तयारी करीत असून दावा केला होता. याबाबत दोन्ही पक्षांतील वरिष्ठांनी चर्चा करून ठाकरे गटाने माघार न घेतल्यामुळे अखेर रवींद्र सावंत यांनी सकाळी शिंदे गटातून एबी फॉर्म भरून उमेदवारी अर्ज दाखल केला. सीवूड्समध्ये भाजपचे पदाधिकारी दत्ता घंगाळे यांनाही पक्षाने एबी फॉर्म देऊनही स्वाक्षरी न दिल्यामुळे अखेर त्यांनी शिंदे गटात प्रवेश करून ते स्वतः आणि त्यांची पत्नी अश्विनी घंगाळे यांनी शिंदे गटाच्या एबी फॉर्मवर उमेदवारी भरली.

ऐनवेळी पक्षांतर
शिंदे गटात असलेले माजी नगरसेवक अशोक गावडे आणि त्यांची कन्या सपना गावडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे त्यांना उमेदवारी देण्यात आली. वाशीत ठाकरे गटाचे उपनेते विठ्ठल मोरे यांचा मुलगा अवधूत मोरे यांना उमेदवारी देण्यात आली. शरद पवार गटाच्या माजी नगरसेविका सलुजा सुतार यांनी ऐनवेळी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनाही उमेदवारी देण्यात आली.

महाविकास आघाडीत काँग्रेस १२ जागांवर निवडणूक लढवत आहोत. ठाकरे गट, मनसे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटासोबत आम्ही महापालिकेच्या सर्वच जागांवर महाविकास आघाडी केली आहे. काही पदाधिकाऱ्यांना सामावून घेता न आल्यामुळे थोडे नुकसान झाले आहे.
- रामचंद्र दळवी, नवी मुंबई जिल्हाध्यक्ष, काँग्रेस

गेले अनेक दिवस सुरू असलेल्या चर्चेवर एकमत झाले नाही. शेवटी आम्ही आज सर्व १११ जागांवर आमच्या पक्षांच्या उमेदवारांना एबी अर्ज देऊन उमेदवारी दाखल केली. आता आम्ही एकमेकांविरोधात लढण्यास सज्ज आहोत.
- द्वारकानाथ भोईर, जिल्हाप्रमुख, शिवसेना शिंदे गट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com