पनवेल महापालिकेसाठी महायुती

पनवेल महापालिकेसाठी महायुती

Published on

पनवेल, ता. ३० (बातमीदार) : महापालिका निवडणुकीसाठी अखेर सत्ताधारी महायुतीची अधिकृत घोषणा करण्यात आली. आमदार प्रशांत ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांची युती जाहीर केली. पनवेलचे प्रभारी महेश बालदी यांनी युतीची औपचारिक घोषणा केली. महायुतीच्या जागावाटपाकडे लक्ष लागले असतानाच, या घोषणेनंतर लगेचच विरोधी महाविकास आघाडीनेही आपले जागावाटप जाहीर केले. त्यामुळे पनवेल महापालिका निवडणुकीतील राजकीय चित्र पूर्णपणे स्पष्ट झाले असून, दोन्ही आघाड्यांमध्ये थेट लढत रंगणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

महायुतीच्या पत्रकार परिषदेला आमदार प्रशांत ठाकूर, रामदास शेवाळे, परेश ठाकूर, आमदार विक्रांत पाटील, बाळासाहेब पाटील, प्रीतम म्हात्रे, अविनाश कोळी आदी प्रमुख नेते उपस्थित होते. पनवेल शहराच्या सर्वांगीण विकासासाठी, तसेच स्थिर व सक्षम प्रशासन देण्यासाठी महायुती एकत्र लढण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली. युतीतील सर्व घटक पक्षांमध्ये चर्चा करून जागावाटप निश्चित करण्यात आले असून, कोणताही अंतर्गत मतभेद न ठेवता एकजुटीने निवडणूक लढवली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महायुतीच्या घोषणेनंतर महाविकास आघाडीनेही आपले जागावाटप जाहीर केले. शेतकरी कामगार पक्ष, शिवसेना (उद्धव ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), काँग्रेससह इतर घटक पक्षांमध्ये जागांची विभागणी करण्यात आली आहे. त्यामुळे पनवेल महापालिकेची निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. महायुती व महाविकास आघाडीने जागावाटप जाहीर केल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, प्रचाराला वेग येण्याची शक्यता आहे.

महायुतीमधील जागावाटप
भाजप ७१
शिवसेना ४
राष्ट्रवादी काँग्रेस २
आरपीआय (आठवले गट) १

महाविकास आघाडीतील जागावाटप
शेतकरी कामगार पक्ष ३३
शिवसेना (उद्धव ठाकरे गट) १९
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ७
काँग्रेस १२
मनसे २
समाजवादी पार्टी १
वंचित बहुजन आघाडी १
अन्य ३

Marathi News Esakal
www.esakal.com