जीवरक्षक कक्ष बंद
जीवरक्षक कक्ष बंद
श्रीवर्धन किनाऱ्यावर पर्यटक सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
श्रीवर्धन, ता. ३० (वार्ताहर) : श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यावरील बंधाऱ्याच्या सुशोभीकरणामुळे हे ठिकाण पर्यटकांचे आवडते पर्यटनस्थळ बनले असले, तरी पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उभारण्यात आलेला जीवरक्षक कक्ष बंद अवस्थेत असल्याने गंभीर सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. ३ डिसेंबर २०२३ रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बंधाऱ्याच्या सुशोभीकरणाचे लोकार्पण झाले होते. सुमारे १.८ किलोमीटर लांबीच्या या बंधाऱ्यावर अत्याधुनिक बाके, सेल्फी पॉइंट, विद्युत रोषणाई, मच्छीमार व्यावसायिकांचे शिल्प तसेच समुद्री जीवांच्या प्रतिकृती उभारण्यात आल्या आहेत.
या सुविधांमुळे पर्यटकांची संख्या लक्षणीय वाढली असून अनेक पर्यटक समुद्रातील फेसाळणाऱ्या लाटांमध्ये पोहण्याचा आनंद घेताना दिसतात; मात्र पाण्यात उतरणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक असलेला जीवरक्षक कक्ष कुलूपबंद असल्याचे वास्तव समोर आले आहे. एखाद्या पर्यटकाला पाण्यात धोका निर्माण झाल्यास तातडीच्या बचावासाठी नगर परिषदेने कोणतीही ठोस उपाययोजना आखलेली नसल्याचे दिसून येते.
श्रीवर्धन नगर परिषदेने समुद्रकिनाऱ्यावर चार कंत्राटी सुरक्षा रक्षक नेमले आहेत; मात्र तब्बल तीन किलोमीटर लांबीच्या किनाऱ्याची जबाबदारी केवळ चार सुरक्षा रक्षकांवर असल्याने गर्दीच्या काळात त्यांची मोठी दमछाक होत असल्याचे चित्र आहे. तसेच पर्यटकांच्या सुरक्षेसाठी लावण्यात आलेल्या सूचना फलकांवरील अक्षरे पुसट झाल्याने अनेक पर्यटक नियमांकडे दुर्लक्ष करीत किनाऱ्यावर जात असल्याचे दिसते.
नगर परिषदेकडून खुलासा
जीवरक्षक कक्षात पाण्यात बुडणाऱ्या व्यक्तीला वाचवण्यासाठी जे साहित्य गरजेचे असते, ते उपलब्ध आहे. सध्या सीसीटीव्हीची यंत्रसामग्री कक्षात ठेवली असल्याने कुलूप लावले आहे.
प्रशिक्षित जीवरक्षकांची तातडीने गरज
पाण्यात बुडणाऱ्या व्यक्तीला वाचवण्यासाठी रेस्क्यू ट्यूब, थ्रो-बॅग, लाइफ जॅकेट, प्रथमोपचार साहित्य, सीपीआर व रेस्क्यू ब्रीदिंगसारख्या जीवनरक्षक कौशल्यांचे प्रशिक्षण असलेले जीवरक्षक आवश्यक असतात; मात्र श्रीवर्धन नगर परिषदेने अद्याप प्रशिक्षित जीवरक्षकांची नेमणूक केलेली नाही. नगर परिषदेच्या वतीने दिलेल्या खुलाशानुसार जीवरक्षक कक्षात आवश्यक साहित्य उपलब्ध असून सध्या सीसीटीव्ही यंत्रणा ठेवण्यात आल्याने कक्षास कुलूप लावण्यात आले आहे. तरीही वाढत्या पर्यटक संख्येचा विचार करता प्रशिक्षित जीवरक्षकांची तातडीने नेमणूक करणे व जीवरक्षक कक्ष कार्यान्वित करणे आवश्यक असल्याची जोरदार मागणी नागरिक व पर्यटकांकडून होत आहे.

