कुठे वाजतगाजत तर कोणाचा एकला चलो रे...

कुठे वाजतगाजत तर कोणाचा एकला चलो रे...

Published on

शक्तिप्रदर्शन विरुद्ध ‘एकला चलो रे’
डोंबिवलीत अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी संमिश्र चित्र
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ३० : महायुतीकडून अधिकृत उमेदवारी जाहीर होताच दिग्गजांनी वाजतगाजत मिरवणूक काढत शक्तिप्रदर्शन करीत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार काही मोजक्याच शिलेदारांच्या साथीने अर्ज भरण्यासाठी ‘एकला चलो रे’चा नारा देत आल्याचे दिसून आले. युतीची चर्चा असली तरी आपल्या मित्रपक्षांतून कोणाला उमेदवारी मिळाली आणि किती जणांना उमेदवारी मिळाली, याविषयीदेखील माहिती नसल्याने काही ठिकाणी अतिउत्साह तर काही ठिकाणी संभ्रमाचे वातावरण दिसून आले.
कल्याण-डोंबिवलीत महायुतीत जागावाटपावरून तिढा सुटला नसल्याने त्याचा परिणाम उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी केंद्राच्या ठिकाणी दिसून आला. काही प्रभागांत भाजपाचेच चारही उमेदवारांचे पॅनेल तर कोठे दोन भाजपा दोन शिवसेना, कोठे शिवसेनेचे चारही उमेदवार अशा पद्धतीने उमेदवार अर्ज भरण्यास येत होते. मनासारखे पॅनेल पडल्याने व पक्षांकडूनदेखील आपल्यासोबत हवे त्यांनाच उमेदवारी जाहीर करण्यात आल्याने काहींच्या पॅनेलमध्ये चांगलाच उत्साह संचारल्याचे दिसून आले. भाजप आणि शिंदे गट यांच्या उमेदवारांनी ढोलताशांच्या गजरात, घोषणाबाजी आणि शक्तिप्रदर्शन करीत निवडणूक प्रभाग कार्यालयाच्या दिशेने प्रस्थान केले. सकाळी १० वाजल्यापासूनच प्रत्येक उमेदवार त्याच्या राहत्या घरापासून ते मंदिर, महापुरुषांच्या पुतळ्यांचे दर्शन घेत मग उमेदवारी अर्ज भरण्याच्या ठिकाणी आले. शिवसेनेच्या उमेदवारांनी तर भगवे फेटे बांधून पक्षाचे झेंडे फडकवत मिरवणूक काढली. पालिका निवडणुकीचा अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस होता. त्यामुळे उमेदवारांनी मोठ्या उत्साहात आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.

युती असूनही भाजपा आणि शिंदे गटाचे उमेदवार एकत्र उमेदवारी अर्ज भरण्यास आल्याचे फारसे काही चित्र दिसून आले नाही. आपापल्या पक्षाच्या उमेदवारांसह किंवा आपले शक्तिप्रदर्शन वेगळे करीत उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले. दुसरीकडे ठाकरे गट आणि मनसेचे उमेदवार मात्र एकत्र उमेदवारी अर्ज भरण्यास आल्याचे दिसून आले. अपक्ष, राष्ट्रवादी, काँग्रेस, वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांचा ‘एकला चलो रे’चा नारा दिसून आला. शांततेत अनुमोदक सोबत घेत त्यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.

प्रत्येकाच्या मनात धाकधूक
जागावाटपाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांकडून अद्याप अधिकृत आकडे जाहीर करण्यात आलेले नसल्याचे चित्र दिसत आहे. काही प्रभागांत युती असूनही शिवसेनेच्या तीन ते चार उमेदवारांना आणि भाजपाच्यादेखील चार उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आले असल्याची उमेदवारांमध्ये चर्चा आहे. दुसरीकडे दोन्ही पक्षांकडून चारही उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. कोठे अपक्ष म्हणून उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. यामुळे प्रत्येकाच्या मनात संभ्रम निर्माण झाल्याचे तसेच आपल्या विरोधात नक्की कोण आहे, याविषयीदेखील चित्र स्पष्ट नसल्याचे दिसून आले.

रात्रभर कार्यालयाच्या बाहेर
पक्षांकडून सोमवारी (ता. २९) सायंकाळपासून उमेदवारांना एबी फॉर्म वाटप करण्यास सुरुवात झाली. आपल्याला एबी फॉर्म मिळेल, या आशेवर अनेक इच्छुकांनी पक्षातील नेत्यांच्या आणि काही पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर गर्दी केली होती. भाजपाचे इच्छुक उमेदवार तर पहाटे चार वाजेपर्यंत ताटकळात उभे होते. यानंतरही काहींच्या पदरी निराशाच पडली. त्यामुळे त्यांच्या कार्यालयातदेखील शुकशुकाट दिसून आला.

काहींची लॉटरी
दोन ते तीन तिकिटांची मागणी करणारे काही कार्यकर्ते सातत्याने नेत्यांच्या पाठी लांगूलचालन करीत होते. त्यातच एकच तिकीट मिळणार असल्याचे समजताच त्यांचे हे पाठी पाठी फिरणे काहीसे वाढले होते. शेवटपर्यंत आपल्याला दोन ते तीन तिकिटे मिळणार नाही, असे चित्र असताना पारड्यात दोन तिकिटे पडल्याने काही उमेदवारांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. केंद्रावरदेखील ते आनंदाने बागडताना दिसून आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com