अर्ज दाखल करण्यासाठी धावपळ
अर्ज दाखल करण्यासाठी धावपळ
भाईंदर, ता. ३० (बातमीदार) : मिरा-भाईंदर महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत मंगळवारी (ता. ३०) नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. भाजप-शिवसेना युती आणि महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा शेवटपर्यंत न सुटल्याने, उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांची प्रचंड धावपळ उडाली. दुपारी ३ वाजण्याची मुदत संपल्यानंतरही सायंकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज स्वीकारण्याचे काम सुरू होते. भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात सोमवारी (ता. २९) रात्री उशिरापर्यंत जागावाटपाच्या चर्चा सुरू होत्या; मात्र भाजपने दिलेला प्रस्ताव शिवसेनेने फेटाळल्याने युती होणार नाही, हे निश्चित झाले. त्यानंतर रात्रीतूनच दोन्ही पक्षांनी उमेदवारांना ‘एबी फॉर्म’ वाटप केले.
मविआमध्येही (ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट) एकमत न झाल्याने प्रत्येक पक्षाने स्वतंत्रपणे आपले उमेदवार रिंगणात उतरवल्याचे चित्र दिसले. यासोबतच मनसेनेही अनेक प्रभागांत आपले उमेदवार उभे केले आहेत. सकाळी ११ वाजल्यापासूनच भाईंदरमधील सातही निवडणूक केंद्रांवर कार्यकर्त्यांची गर्दी व्हायला सुरुवात झाली.
कडक बंदोबस्त
निवडणूक कार्यालयात उमेदवारासह केवळ सूचक आणि अनुमोदक अशा तिघांनाच प्रवेश दिला जात होता. उर्वरित कार्यकर्त्यांनी बाहेरच ठाण मांडल्याने प्रचंड गर्दी झाली होती. ढोल-ताशांच्या गजरात आणि विजयाच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. ही गर्दी पांगवण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची मोठी दमछाक झाली. अनेक उमेदवारांकडे कागदपत्रांची पूर्तता नसल्याने ती जमवण्यासाठी कार्यकर्त्यांची पळापळ सुरू होती. दुपारी ३ वाजण्यापूर्वी जे उमेदवार कार्यालयाच्या आवारात पोहोचले होते, त्यांचे अर्ज स्वीकारण्याचे काम सायंकाळी उशिरापर्यंत सुरू राहिले.
मैत्रीपूर्ण लढत की बंडाळी?
युती तुटल्याने अनेक प्रभागांत भाजप विरुद्ध शिवसेना (शिंदे गट) अशी थेट लढत पाहायला मिळणार आहे. मोठ्या आघाड्यांमधील गोंधळाचा फायदा घेण्यासाठी अनेक अपक्ष उमेदवारांनीही मोठ्या संख्येने अर्ज दाखल केले आहेत. एकाच वेळी शेकडो उमेदवार आणि हजारो कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याने प्रशासकीय यंत्रणेवर मोठा ताण आला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

