बिबट्याच्या दहशतीने ग्रामीण भाग त्रस्त

बिबट्याच्या दहशतीने ग्रामीण भाग त्रस्त

Published on

बदलापूर, ता. ३० (बातमीदार) : अंबरनाथ तालुक्यातील बदलापूर, वांगणी व परिसरातील ग्रामीण भागात महिनाभरापासून बिबट्याचा मुक्त वावर सुरू असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आंबेशिव परिसरात बिबट्याने शेळ्या, कुत्रे व कोंबड्यांवर हल्ले करून अनेक जनावरे फस्त केल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे ग्रामस्थांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर वन विभागाच्या कथित अपयशाचा निषेध नोंदवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या वतीने बदलापूर येथील वन विभाग कार्यालयात प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले.
ग्रामीण भागातील नागरिक रात्रीच्या वेळी घराबाहेर पडण्यास घाबरत असून, शेतकरी व मजूर वर्गात अस्वस्थता पसरली आहे. बिबट्याच्या हालचाली सीसीटीव्ही फुटेज तसेच प्रत्यक्षदर्शींच्या माध्यमातून समोर आल्या आहेत. वन विभागाच्या वतीने महिनाभरापासून बिबट्याचा शोध घेण्यासाठी गस्त, पिंजरे व कॅमेरे बसवून मोहीम राबवली जात असली, तरी त्याला अद्याप जेरबंद करण्यात यश न आल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी वन विभाग कार्यालयात पिंजऱ्यात ठेवलेली बिबट्याची प्रतिकृती देत उपरोधिक निषेध नोंदवला. वन विभाग बिबट्याला पकडण्यात अपयशी ठरत असून तातडीने प्रभावी उपाययोजना राबवून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. आंबेशिव, वांगणीसह अंबरनाथ तालुक्यातील अनेक गावांतील ग्रामस्थ भयभीत असताना प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याने संतप्त भावना व्यक्त होत आहेत.

महिनाभरापासून बदलापूर-वांगणी परिसरातील ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली वावरत आहेत. बिबट्याचा मुक्त संचार असूनही त्याला जेरबंद करण्यात वनविभाग अपयशी ठरला आहे. मानवावर हल्ला झाल्यानंतरच कारवाई होणार का, असा सवाल उपस्थित होतो. प्रशासनाने गांभीर्याने काम करावे, यासाठी आम्ही हे प्रतिकात्मक आंदोलन केले आहे. लवकरात लवकर ठोस कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल.
- अविनाश देशमुख, प्रदेश सरचिटणीस, राष्ट्रवादी शरद पवार गट


महिनाभरापासून आमचे कर्मचारी दिवस-रात्र गस्त घालत आहेत. जनजागृती मोहीम राबवली जात असून, बिबट्याचे ठसे शोधण्यासाठी पिंजरे, कॅमेरे व अन्य यंत्रणा बसवण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागात सहज उपलब्ध होणाऱ्या शिकारीमुळे बिबट्याचा वावर दिसत आहे. मात्र, वन विभागाच्या सतर्कतेमुळे बिबट्या हळूहळू जंगल परिसरात सरकत असून, त्याच्या हालचालींवर २४ तास लक्ष ठेवले जात आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आणखी उपाययोजना राबवण्यात येत आहेत.
- भाग्यश्री पोले, सहाय्यक वनसंरक्षक


बदलापूर : येथील वन विभाग कार्यालयाला राष्ट्रवादीने पिंजऱ्यात ठेवलेली बिबट्याची प्रतिकृती देत उपरोधिक निषेध नोंदवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com