नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांसाठी दिलासा;

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांसाठी दिलासा;

Published on

प्रीपेड टॅक्सी, ऑटो सेवा दर निश्चित
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांसाठी दिलासा

वसंत जाधव/ सकाळ वृत्तसेवा
पनवेल, ता. ३० (बातमीदार) : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. प्रीपेड टॅक्सी व प्रीपेड ऑटोरिक्षा सेवा अधिकृतपणे कार्यान्वित करण्यात आली आहे. या सेवांसाठी नवीन व सुधारित भाडेदर जाहीर करण्यात आले आहेत. अंतरानुसार निश्चित दर आणि प्रोत्साहन टक्केवारी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना मनमानी भाडे, वादविवाद आणि अतिरिक्त आकारणीपासून दिलासा मिळणार आहे.

प्रवाशांच्या सोयीसाठी भाडेदर पूर्णपणे पारदर्शक व स्लॅबनिहाय निश्चित करण्यात आले आहेत. विमानतळ परिसरात प्रीपेड काउंटरद्वारे थेट तिकीट उपलब्ध होणार आहे. यामुळे विशेषतः बाहेरून येणाऱ्या प्रवासी, ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना सुरक्षित व विश्वासार्ह सेवा मिळणार आहे. प्रवाशांचा वेळ व पैसा वाचणार आहे. या प्रीपेड सेवेमुळे विमानतळावर उतरल्यावर भाड्याबाबत होणारे वाद टळणार आहेत.

निश्चित दरामुळे विश्वास वाढणार असून, स्थानिक तसेच बाहेरून येणाऱ्या प्रवाशांना ही सेवा विशेष फायदेशीर ठरणार आहे. विमानतळ परिसरातील टॅक्सी स्टँडची परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीदरम्यान प्रवाशांच्या सोयी, प्रीपेड टॅक्सी व्यवस्थापन, भाडेदरांचे फलक, रांगेची शिस्त तसेच वाहतूक नियोजन याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. प्रवाशांची कोणतीही गैरसोय होऊ नये तसेच ठरवून दिलेल्या दरांनुसारच सेवा दिली जावी, याबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. प्रादेशिक परिवारांचे अधिकारी २४ तास कार्यरत राहणार आहेत. त्यामुळे ठरवून दिलेल्या भाडेदराप्रमाणे टॅक्सी, रिक्षाचालकांनी भाडे आकारले नाही, तर त्यांची तक्रार पनवेल प्रादेशिक परिवहनकडे करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
-----
आरटीओची २४ तास गस्त
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी व वाहतूक व्यवस्थेच्या सुरळीत अंमलबजावणीसाठी पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) २४ तास कार्यरत आहे. प्रीपेड टॅक्सी व ऑटोरिक्षा सेवांवर काटेकोर लक्ष ठेवण्यात येत असून, अनधिकृत वाहतूक, जादा भाडे आकारणी आणि नियमभंग करणाऱ्यांविरोधात तत्काळ कारवाई केली जात आहे. प्रवाशांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी आरटीओचे अधिकारी व कर्मचारी सातत्याने गस्त घालत असून, तक्रारींची तत्काळ दखल घेतली जात आहे.
----------------
चौकट
प्रीपेड टॅक्सीचे भाडेदर
प्रीपेड टॅक्सी सेवेसाठी प्रतिकिलोमीटर २०.६६ रुपये असा मूलभूत भाडेदर निश्चित करण्यात आला आहे.
६ किमीपर्यंत : २५ % प्रोत्साहनासह १५५ रुपये
६.१ ते ८ किमी : २०७ रुपये
८.१ ते १० किमी : २५८ रुपये
१०.१ ते १२ किमी : ३१० रुपये
१२.१ ते १४ किमी : २० % प्रोत्साहनासह ३४७ रुपये
१४.१ ते १६ किमी : ३९७ रुपये
१६.१ ते १८ किमी : ४४६ रुपये
१८.१ ते २० किमी : ४९६ रुपये
२०.१ ते २२ किमी : ५४५ रुपये
२२.१ ते २४ किमी : ५९५ रुपये
२४.१ ते २६ किमी : १५ % प्रोत्साहनासह ६१८ रुपये
२६.१ ते २८ किमी : ६६५ रुपये
२८.१ ते ३० किमी : ७१३ रुपये
३० ते ४२ किमी : ७६० ते ९९८ रुपये
४२.१ किमी पुढे : दर दोन किलोमीटरच्या स्लॅबनुसार भाडे
प्रीपेड ऑटोरिक्षा सेवेसाठी दर
प्रीपेड ऑटोरिक्षासाठी प्रतिकिलोमीटर १७.१४ रुपये असा मूलभूत भाडेदर निश्चित करण्यात आला आहे.
६ किमीपर्यंत : २५ % प्रोत्साहनासह १२९ रुपये
६.१ ते ८ किमी : १७१ रुपये
८.१ ते १० किमी : २१४ रुपये
१०.१ ते १२ किमी : २५७ रुपये
१२.१ ते १४ किमी : २० % प्रोत्साहनासह २८८ रुपये
-----------
कोट
नवी मुंबई विमानतळावर कनेक्टिव्हिटी समस्या येऊ नये म्हणून परिवहन विभागामार्फत टॅक्सी, एनएमएमटी बस, ओला, उबेर यासाठी ऑटो स्टॅन्ड शेअर टॅक्सी, शेअर ऑटो स्टॅन्डची उभारणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे जोपर्यंत प्रवाशांच्या सोयीसाठी पनवेल प्रादेशिक परिवहनचे पथक अधिकारी, कर्मचारी २४ तास या ठिकाणी कार्यरत राहील. प्रादेशिक परिवहनने दळणवळणासंदर्भात घालून दिलेल्या नियमावलीमुळे विमानतळ सुरू झाल्यापासून या परिसरात कुठल्याही प्रकारची तक्रार आलेली नाही. प्रवाशांच्या तक्रारीसाठी परिवहन विभाग सज्ज आहे.
- विवेक भीमनवार, परिवहन आयुक्त

Marathi News Esakal
www.esakal.com