जाचक अटीमुळे शेतकऱ्यांवर सावकारीचा पाश.
मोखाड्याचा बळीराजा संकटात!
ई-केवायसी, कागदपत्रांच्या तांत्रिक कचाट्यात शेतकरी हवालदिल
मोखाडा, ता. ३१ (बातमीदार) : निसर्गाच्या लहरीपणामुळे आधीच उद्ध्वस्त झालेल्या मोखाडा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जखमेवर आता प्रशासनाच्या जाचक अटींनी मीठ चोळले आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे होऊन तीन महिने उलटले तरी अद्याप अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात भरपाईची रक्कम जमा झालेली नाही. तांत्रिक अटी आणि ई-केवायसीच्या फेऱ्यात ही मदत अडकल्याने जगाचा पोशिंदा संसाराचा गाडा हाकण्यासाठी सावकारी पाशात अडकत चालला आहे.
सप्टेंबरमधील नुकसानीसाठी तालुक्यातील १,४४१ शेतकरी पात्र ठरले, तर दिवाळीनंतरच्या अवकाळी पावसासाठी आठ हजारांहून अधिक शेतकऱ्यांची निवड झाली. शासनाने निधी मंजूर केल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात आधार अपडेट, मोबाईल लिंक, बँक खाते जोडणे आणि सातबाऱ्यावरील नावांच्या दुरुस्त्या अशा कागदपत्रांच्या जाळ्यात शेतकरी अडकला आहे. ही तांत्रिक प्रक्रिया पूर्ण न झाल्याने पात्र असूनही शेतकऱ्यांच्या हाती दमडीही पडलेली नाही. शेतकऱ्यांनी भरपाईच्या वाटपावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. नुकसान झालेल्या क्षेत्राचा विचार करता, मिळणाऱ्या रकमेमध्ये मोठी तफावत असून, खरा गरजू शेतकरी वंचित राहत असल्याचा आरोप केला जात आहे. त्यातच करपा, बुरशी आणि बगळ्या रोगामुळे पीक भुईसपाट झाल्याने हातात काहीच उरलेले नाही.
-------------
कर्ज काढण्याची वेळ
शेती पूर्णपणे बुडाल्याने घरात खायला दाणा उरलेला नाही. मुलांचे शिक्षण आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी शेतकरी आता खासगी सावकारांकडून व्याजाने पैसे घेत आहे. सरकारने मदतीची घोषणा केली, पण ती कागदावरच राहिली. आता उसनवारी करून दिवस काढण्याची वेळ आली आहे, अशी हतबलता स्थानिक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
-------------
तहसील यादीमध्ये माझ्या नावे दोन हजार ८०० रुपये रक्कम टिपली आहे. त्यासाठी मला आधार अपडेट, बँक केवायसी, मोबाईल नंबर अशा विविध कागदपत्रांची पूर्तता करण्यास सांगितले आहे. माझ्याकडे आधार कार्ड व सातबारा, बँक खाते नंबर याशिवाय कुठलीही कागदपत्रे नाहीत. मी एक एकरवर लावलेल्या नागलीच्या पिकात मला उत्पन्न न मिळाल्याने वर्षभराच्या कुटुंब उदरनिर्वाहासाठी सावकारातडून कर्ज काढावे लागले आहे.
- कोंडाजी त्रंबक ठोंबरे, शेतकरी, जोगलवाडी
-------------
सप्टेंबरमध्ये झालेल्या नुकसानीचा लाभ सर्व शेतकऱ्यांना मिळाला आहे. दिवाळीनंतर तीन हजार पात्र लाभार्थी नुकसानभरपाईच्या अनुदानापासून ई-केवायसीमुळे बाकी राहिले आहेत. नागरिक स्थलांतरित झाल्यामुळे ई-केवायसीची अडचण येत आहे. त्या लाभार्थ्यांच्या याद्या संबंधित ग्रामपंचायतीकडे पाठवल्या आहेत. ते होताच त्यांनाही नुकसानभरपाईचा लाभ मिळेल.
- बाळाराम भला, नायब तहसीलदार, मोखाडा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

