

महावितरणच्या खांबांवर बेकायदा केबल्स
बोईसरमध्ये नागरिकांवर अपघाताची टांगती तलवार; प्रशासनाकडून कारवाईचा दावा
बोईसर, ता. ३१ (वार्ताहर) : बोईसर आणि तारापूर औद्योगिक परिसरातील महावितरणच्या वीज खांबांवर खासगी कंपन्यांनी बेकायदा फायबर ऑप्टिक केबल्सचे जाळे विणले असून, यामुळे सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. या प्रकरणाची तक्रार होऊनही ठोस कारवाई होत नसल्याने संताप व्यक्त होत असून, एखादी मोठी दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण, असा सवाल आता विचारला जात आहे.
धनेश विजय क्षीरसागर या तक्रारदाराने उपकार्यकारी अभियंता, बोईसर औद्योगिक उपविभाग यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या माहितीनुसार, खासगी कंपन्यांनी कोणतीही परवानगी न घेता महावितरणच्या खांबांचा वापर करून अत्यंत धोकादायक पद्धतीने केबल्स टाकल्या आहेत. या केबल्स अनेक ठिकाणी सैल झाल्या असून, जमिनीच्या अगदी जवळ लटकत आहेत. यामुळे शालेय विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि वाहनचालकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.
वीजवाहिन्या आणि केबल्स एकत्र आल्याने आगीचा धोका असून, रस्त्यावर लटकणाऱ्या तारांमुळे दुचाकीस्वारांचे अपघात होण्याची शक्यता आहे. तर पावसाळ्यात या केबल्समधून वीज उतरण्याची भीती नाकारता येत नाही, अशी भीतीही नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे बेकायदा केबल्स त्वरित काढून दोषी कंपन्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. प्रशासन कागदी घोडे नाचवण्यापेक्षा प्रत्यक्ष मैदानात उतरून सर्व अनधिकृत केबल्स कधी हटवणार, याकडे आता बोईसरकरांचे लक्ष लागले आहे.
---------------
तक्रारीची दखल घेऊन आम्ही आतापर्यंत अवधनगर रोड, मुकुट पेट्रोल पंप, थुंगा हॉस्पिटल परिसर अशा ८ ते १० ठिकाणी कारवाई करून केबल्स हटवल्या आहेत. उर्वरित ठिकाणीही लवकरच कारवाई पूर्ण केली जाईल. नागरिकांची सुरक्षा ही आमची प्राथमिकता आहे.
- प्रभूचरण चौधरी, उपकार्यकारी अभियंता, महावितरण, बोईसर औद्योगिक उपविभाग
---------------
प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. तक्रार केल्यानंतरही अधिकारी वेळ मिळाल्यावर बघू अशी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. भविष्यात कोणतीही जीवितहानी झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी महावितरणवर राहील.
- धनेश क्षीरसागर, तक्रारदार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.