पालिकेत घराणेशाही जोरात!
पालिकेत घराणेशाही जोरात!
कार्यकर्त्यांना डच्चू, नेत्यांची मुले-नातेवाइकांना उमेदवारी
मिलिंद तांबे ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ : आम्ही घराणेशाहीच्या विरोधात आहोत, असा डांगोरा पिटणाऱ्या राजकीय पक्षांचा बुरखा होऊ घातलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या उमेदवारी याद्यांनंतर फाटला आहे. सर्वच प्रमुख पक्षांनी सामान्य कार्यकर्त्यांना डावलून आमदार, खासदारांच्या मुला-मुलींना, पत्नीला किंवा जवळच्या नातेवाइकांना उमेदवारी दिल्याने मुंबईच्या राजकारणात ‘गॉडफादर’ संस्कृतीचा बोलबाला पाहायला मिळत आहे. त्यामुळे निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून अनेक ठिकाणी बंडखोरीचे निशाण फडकू लागले आहे.
निवडणूक मैदानात उतरलेल्या उमेदवारांच्या नावावर नजर टाकली तर घराणेशाहीचे जाळे स्पष्टपणे दिसते. शिवसेनेचे (ठाकरे गट) माजी खासदार विनायक राऊत यांचे सुपुत्र गीतेश राऊत यांना प्रभाग क्रमांक ८९ मधून, आमदार सुनील प्रभू यांचे सुपुत्र अंकित प्रभू यांना प्रभाग क्रमांक ४१ आणि खासदार संजय दिना पाटील यांची कन्या राजुल पाटील यांना प्रभाग क्रमांक ११४ मैदानात उतरवण्यात आले आहे. तसेच माजी आमदार अशोक धात्रक यांचे पुत्र अजिंक्य धात्रक यांनाही कुलाब्यातून प्रभाग क्रमांक २२५ मधून संधी मिळाली आहे.
शिवसेना (शिंदे गट) पक्षातून आमदार अशोक पाटील यांचे पुत्र रूपेश पाटील यांना प्रभाग क्रमांक ११५, आमदार दिलीप लांडे यांची कन्या शैला लांडे यांना प्रभाग क्रमांक १६१ आणि कुर्ल्याचे आमदार मंगेश कुडाळकर यांचे सुपुत्र हर्षद कुडाळकर यांना प्रभाग क्रमांक १६९ मधून उमेदवारी देण्यात आली आहे. भायखळ्याच्या माजी आमदार यामिनी जाधव याही स्वतः प्रभाग क्रमांक २११ रिंगणात आहेत. तर पक्षाचे माजी आमदार सदा सरवणकर यांच्या घरातही यंदा उमेदवारीची दुहेरी लॉटरी लागली आहे. सरवणकर यांच्या मुलाला आणि मुलीला अशा दोघांनाही पक्षाने निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे. सदा सरवणकर यांचे सुपुत्र समाधान सरवणकर यांना प्रभाग क्रमांक १९४ मधून, तर कन्या प्रिया सरवणकर यांना प्रभाग क्रमांक १९१ मधून उमेदवारी देण्यात आली आहे.
आमदार अमित साटम यांचे मेव्हणे रोहन राठोड प्रभाग ६८ मधून लढत आहेत, तर माजी खासदार किरीट सोमय्या यांचे सुपुत्र नील सोमय्या यांनाही प्रभाग क्रमांक १०८ मधून तिकीट देण्यात आले आहे. तर आमदार प्रवीण दरेकर यांचा भाऊ प्रकाश दरेकर यांना प्रभाग क्रमांक तीनमधून उमेदवारी देण्यात आली आहे.
मलिक कुटुंबीयांचा प्रभाव
राष्ट्रवादी (अजित पवार गट) पक्षातून आमदार नवाब मलिक यांचे बंधू कप्तान मलिक यांना प्रभाग क्रमांक १६५ आणि बहीण डॉ. सईदा खान यांना प्रभाग क्रमांक १६८ मधून उमेदवारी देऊन मलिक कुटुंबीयांचा प्रभाव कायम ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.
निष्ठावान कार्यकर्ते वाऱ्यावर; बंडखोरीचा भडका
पक्षासाठी आयुष्य वेचणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलून राजपुत्रांना उमेदवारी दिल्याने अनेक प्रभागांत असंतोष आहे. माटुंगा येथील भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका नेहल शहा यांचे तिकीट कापल्याने त्यांनी बंडखोरीचे पाऊल उचलले आहे. तर कुर्ला येथून प्रभाग १६९ मध्ये भाजपचे संजय जाधव अनेक वर्षांपासून सक्रिय होते; मात्र हे तिकीट आमदार कुडाळकर यांचे सुपुत्र हर्षद कुडाळकर यांना मिळाल्याने जाधव यांनी थेट बंडखोरी करीत अपक्ष किंवा इतर पर्यायांची चाचपणी सुरू केली आहे.
पक्ष वाढवला कुणी आणि फळ मिळतेय कुणाला?
आम्ही वॉर्डमध्ये स्वखर्चाने काम केले, लोकांच्या सुख-दुःखात धावून गेलो; पण जेव्हा सत्तेची फळे चाखण्याची वेळ आली, तेव्हा नेत्यांनी आपल्याच घरात पदे वाटली, अशी उद्विग्न भावना सामान्य कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे. घराणेशाहीच्या या वरचढपणामुळे मुंबई महापालिकेत लोकशाहीऐवजी ‘घराणेशाही’चाच कारभार चालणार का, असा सवाल आता मतदार विचारत आहेत.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या घरात तीन तिकिटे
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची चुलत बहीण गौरी शिवलकर यांना प्रभाग क्रमांक १५६ मधून शिंदे यांच्या शिवसेनेने उमेदवारी दिली आहे. भाजपमधून राहुल नार्वेकर यांच्या वहिनी हर्षिता नार्वेकर प्रभाग क्रमांक २२५ मधून आणि बंधू मकरंद नार्वेकर प्रभाग क्रमांक २२६ पुन्हा संधी मिळाली आहे. एकाच कुटुंबात तीन तिकिटे दिल्याने राजकीय वर्तुळात घराणेशाहीच्या चर्चेला उधाण आले असून, यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये मात्र संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
आयत्यावेळी कापले तिकीट
भाजपने प्रभाग क्रमांक चारमधून आपले एकनिष्ठ कार्यकर्ते रितेश आंद्रे यांचे तिकीट आयत्यावेळी कापल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. पक्षाने आंद्रे यांना डावलून एका वरिष्ठ नेत्याच्या जवळच्या नातेवाइकाला उमेदवारी दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. रितेश आंद्रे हे मुंबईची शान असलेल्या डबेवाल्यांचे सुपुत्र असून, एका कष्टाळू तरुणावर झालेल्या या अन्यायामुळे डबेवाल्यांच्या संघटनेतही संतापाची लाट उसळली आहे. पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करूनही ऐनवेळी उमेदवारी नाकारल्या गेल्याने रितेश आंद्रे यांनी आता अपक्ष उमेदवारी दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे या प्रभागात भाजपसमोर मोठे आव्हान उभे ठाकले असून, सामान्यांचा मुलगा विरुद्ध नेत्याचा नातेवाईक असा लढा आता पाहायला मिळणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

