सूर्या कालव्यातून पाण्याचा विसर्ग

सूर्या कालव्यातून पाण्याचा विसर्ग

Published on

सूर्या कालव्यातून पाण्याचा विसर्ग
उन्हाळी शेतीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू
कासा, ता. ३१ (बातमीदार) : डहाणू तालुक्यातील सूर्या प्रकल्पांतर्गत असलेल्या धामणी व कवडास धरणांतून सिंचनासाठी अखेर पाणी सोडण्यात आले आहे. मंगळवारी (ता. ३१) डाव्या कालव्यातून पाणी प्रवाहित झाले असून, येत्या दोन दिवसांत उजव्या कालव्यातूनही पाणी सोडले जाणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे. या निर्णयामुळे उन्हाळी पिकांच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सूर्या प्रकल्पाचे कालवे जुने झाल्याने पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत होता. ही गळती रोखण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून कालव्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण व मजबुतीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम अंतिम टप्प्यात असल्याने दरवर्षी १५ डिसेंबरला सोडले जाणारे पाणी यंदा ३१ डिसेंबरला सोडण्यात आले. कालव्यांची दुरुस्ती झाल्यामुळे आता पाणी शेवटच्या टोकापर्यंत जलद गतीने पोहोचण्यास मदत होणार आहे.

पावसाळी हंगामात अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे भातपिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. त्या तुलनेत उन्हाळी हंगामात रोगराईचे प्रमाण कमी आणि उत्पादन चांगले मिळत असल्याने शेतकऱ्यांचा कल दुबार भातशेती व भाजीपाला लागवडीकडे वाढला आहे. पाणी सुटताच शेतकऱ्यांनी आता भातपेरणीच्या कामाला वेग दिला आहे.

कालव्यांना संजीवनी
सूर्या प्रकल्पाचे कालवे अनेक दशके जुने झाल्याने पाण्याचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत होता. ही समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाने विशेष पावले उचलली आहेत.
विस्तीर्ण जाळे : सूर्या प्रकल्पाचा मुख्य कालवा ८० किलोमीटर लांबीचा असून उपकालव्यांसह हे जाळे सुमारे ३०० ते ३५० किलोमीटरपर्यंत पसरलेले आहे.
दुरुस्तीची गरज : जुन्या कालव्यांना तडे गेल्याने शेवटच्या टोकावरील (Tail-end) शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचत नव्हते.
मजबुतीकरण : गेल्या दोन वर्षांपासून कालव्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण करून मजबुतीकरण केले जात आहे.


कालव्यांच्या सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम सुरू असल्याने पाणी सोडण्यास थोडा विलंब झाला. ३१ डिसेंबरला डाव्या कालव्यात पाणी सोडले असून, येत्या दोन दिवसांत उजव्या कालव्यातूनही पाणी सोडले जाईल.
- प्रवीण भुसारे, उपअभियंता, पाटबंधारे विभाग

आम्ही कालव्याच्या पाण्यावर भाजीपाला व भातशेती करतो. पावसाळी शेतीपेक्षा उन्हाळी शेती अधिक फायदेशीर ठरते. यावर्षी पाणी उशिरा मिळाले असले तरी आता आम्ही पेरणीची तयारी पूर्ण केली आहे.
- राजेश वांगड, शेतकरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com