नव्या वर्षात दिमतीला मेट्रो, मिसिंग लिंक
नव्या वर्षात दिमतीला मेट्रो, मिसिंग लिंक
अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प सेवेत येणार; डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे आंतरराष्ट्रीय स्मारकही होणार खुले
बापू सुळे ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ : मुंबईसह एमएमआर क्षेत्रातील विविध प्रकल्प कार्यान्वित झाल्याने मुंबईकरांना वाहतूक कोंडीमुक्त गारेगार प्रवासाची पर्वणी मिळालेली असतानाच आता येणाऱ्या नव्या वर्षातही मेट्रो-२ बी मंडाळे ते डायमंड गार्डन, मेट्रो ४- ए कॅडबरी ते गायमुख, मेट्रो ९ दहिसर पूर्व ते काशीगाव हे तीन मेट्रो प्रकल्प, मुंबई-पुणे मार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्प दिमतीला येणार आहे. त्याशिवाय बहुप्रतीक्षित भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दादर इंदूमिल येथील आंतरराष्ट्रीय स्मारक खुले केले जाणार आहे. तसेच घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नायगाव बीडीडी चाळीतील रहिवाशांनाही गगनचुंबी इमारतीत सुसज्ज घरे मिळणार आहेत.
रस्त्यावरील वाहतूक कोंडी लोकल ट्रेनमधील गर्दीने मुंबईकर बेहाल झाले आहेत. कामाने कमी आणि प्रवासाने जास्त थकवा येत असल्याचे सध्या चित्र आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईसह एमएमआरमधील वाहतुकीला चालना देण्यासाठी एमएमआरडीएकडून नऊ मेट्रो मार्गिकांचे जाळे उभारले जात आहे. त्यापैकी तीन मेट्रो मार्गिका नव्या वर्षात टप्प्याटप्प्याने सुरू केल्या जाणार आहेत. या तिन्ही मार्गिकांचे मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी पाहणी केली असून त्यांचे अंतिम प्रमाणपत्र आल्यानंतर सेवेत येणार आहेत. त्यामुळे मुंबई आणि ठाणेकरांना दिलासा मिळणार आहे.
मेट्रो ९ दहिसर पूर्व ते काशीगाव (पहिला टप्पा)
- लांबी - ४.५ किलोमीटर (एकूण लांबी - १३.५ किलोमीटर)
- स्थानके - दहिसर पूर्व, पांडुरंगवाडी, मिरा गाव, काशीगाव
- मेट्रो ट्रेनच्या सुरक्षा चाचण्या सुरू आहेत.
- ही मार्गिका मेट्रो-२ ए आणि मेट्रो-७ ला जोडणार असल्याने पश्चिम उपनगरातील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
- पूर्ण प्रकल्पाचा एकूण खर्च - ६,६०७ कोटी रुपये
मेट्रो-२ बी मंडाळे ते डायमंड गार्डन (पहिला टप्पा)
- लांबी - ५.३ किलोमीटर (एकूण लांबी - २३.६ किलोमीटर)
- स्थानके - मंडाळे, मानखुर्द, बीएसएनएल, शिवाजी चौक, डायमंड गार्डन
- सध्या मेट्रो ट्रेनच्या वेगवेगळ्या चाचण्या सुरू आहेत.
- पूर्व आणि पश्चिम उपनगराला जोडणारी मंडाळे ते अंधेरीदरम्यानची ही महत्त्वपूर्ण मार्गिका असून पहिल्या टप्प्यामुळे रेल्वेच्या हार्बर मार्गावरील प्रवाशांना फायदेशीर ठरेल.
- संपूर्ण प्रकल्पाचा खर्च - १०,९८६ कोटी रुपये
मेट्रो-४ आणि ४- ए कॅडबरी ते गायमुख (पहिला टप्पा)
- लांबी - ५.३ किलोमीटर (एकूण लांबी - ३५ किलोमीटर)
- स्थानके - कॅडबरी, माजिवडा, कापूरबावडी, मानपाडा, टिकुजिनीवाडी, डोंगरी पाडा, विजय गार्डन, कासारवडवली, गोवनीवाडा, गायमुख
- ठाणे आणि घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी उपयुक्त ठरणार
- प्रकल्पाचा एकूण खर्च - १५,५४८ कोटी रुपये
मिसिंग लिंक
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खंडाळा घाटात होणारी वाहतूक कोंडी फोडण्याबरोबरच प्रवासाला लागणारा वेळ कमी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून तब्बल साडेसहा हजार कोटी रुपये सुमारे १३ किलोमीटर लांबीचा मिसिंग लिंक उभारला जात असून त्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून मार्च-एप्रिलपर्यंत सेवेत येणार आहे. त्यामुळे घाट सेक्शनमधील प्रवास काही मिनिटांत होणार आहे. सुमारे नऊ किलोमीटरचा बोगदा आणि महाकाय केबल स्टे पुलावरून होणार आहे. या मार्गावरील प्रवासासाठी वाहनधारकांना कोणताही अतिरिक्त टोल लागणार नाही.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक
महामानव भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक दादर येथील इंदू मिलच्या जागेत आकाराला आले आहे. एमएमआरडीएकडून १२ एकर जागेवर तब्बल १,०८९ कोटी रुपये खर्चून ४५० फूट उंचीचे भव्य स्मारक उभारले जात आहे. या स्मारकाची प्रवेशद्वार इमारत, संशोधन केंद्र, वाचनालय, प्रेक्षागृह, वाहनतळाचे शंभर टक्के स्ट्रक्चरल कामे झाली आहेत. सध्या अंतर्गत सजावटीची कामे प्रगतिपथावर असून बाह्य विकासाची कामेही सुरू आहेत. त्यामुळे नव्या वर्षात नोव्हेंबरपूर्वी भव्य दिमाखदार स्मारक खुले होऊ शकणार आहे.
नायगाव बीडीडीवासीयांना हक्काचे घर
वरळी बीडीडीच्या साडेपाचशे रहिवाशांना घराचा ताबा दिल्यानंतर आता नायगाव बीडीडीच्या जागेवरील ८६४ रहिवाशांना घराची प्रतीक्षा लागली होती. त्यासाठी भोगवटा प्रमाणपत्र आल्याने म्हाडानेही संबंधित रहिवाशांना घराचा ताबा देण्याची तयारी सुरू केली होती; मात्र मुंबई महापालिकेसह राज्यातील २९ नगरपालिकांची निवडणूक अचारसंहिता लागू झाल्याने नायगाव बीडीडीच्या रहिवाशांना घराचा ताबा मिळू शकलेला नाही; मात्र निवडणूक आचारसंहिता संपताच नव्या वर्षात संबंधित रहिवाशांना घराचा ताबा दिला जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

