१११ पासून ३१ नगरसेवकांपर्यंतचा प्रवास

१११ पासून ३१ नगरसेवकांपर्यंतचा प्रवास

Published on

१११ पासून ३१ नगरसेवकांपर्यंतचा प्रवास
मुंबई पालिकेतील घसरण थांबवण्याचे काँग्रेसपुढे आव्हान; धार्मिक ध्रुवीकरण, बदलत्या राजकारणाचा परिपाक

विनोद राऊत ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ ः मुंबई शहराला सर्वाधिक महापौर देणाऱ्या ग्रँड ओल्ड पार्टी अर्थातच राष्ट्रीय काँग्रेसला मुंबई पालिकेत सातत्याने सुरू असलेली घसरण थोपवता आलेली नाही. १९९१ मध्ये काँग्रेसचे मुंबईत सर्वाधिक १११ नगरसेवक निवडून आले होते. त्यानंतर सुरू झालेली पक्षाची घसरण ही ३१ नगरसेवकापर्यंत येवून ठेपली आहे. मुंबईच्या राजकारणाचे बदलले स्वरूप, भाजपचे वर्चस्व आणि पक्षांतर्गत बेदिली बघता मुंबई पालिकेत कमबॅक करणे, हे काँग्रेससाठी कठीण असल्याचे मानले जाते. या वेळी काँग्रेसने ठाकरे यांच्या शिवसेनेशी फारकत घेऊन वंचितसोबत आघाडी केली आहे.
मुंबई महापालिकेच्या राजकारणात १९८०पर्यंत काँग्रेसचा दबदबा होता. स. का. पाटील, मुरली देवरा, आर. आर. सिंग, निर्मला सावंत प्रभावळकर यासारख्या नेत्यांनी मुंबईचे महापौरपद भूषवले आहे. १९७०पर्यंत काँग्रेसला मुंबईत राजकीय प्रतिस्पर्धी नव्हता; मात्र संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनानात काँग्रेस नेतृत्वाने घेतलेल्या भूमिकेमुळे मुंबईत काँग्रेस पक्षाविरोधात वातावरणनिर्मिती होण्यास सुरुवात झाली होती. १९५७ मध्ये संयुक्त महाराष्ट्र समितीच्या उमेदवारांनी काँग्रेस नेत्यांचा पराभव केला. काँग्रेसच्या भूमिकेमुळे मुंबईत पक्षाला राजकीय आव्हान मिळायला सुरुवात झाली.

शिवसेनेकडून आव्हान
१९६६ मध्ये शिवसेनेच्या उदयानंतर मुंबईचे राजकीय पटल पूर्णपणे बदलून गेला. मराठी माणूस हळूहळू बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या पाठीमागे उभा राहिला. १९८० पर्यंत मध्य मुंबई, भायखळा ते दादर, महालक्ष्मी ते एल्फिन्स्टन रोड या परिसरात अडीच लाख मिल वर्कर होते. त्या वेळी मिलचे शहर असलेल्या मुंबईत डाव्या कामगार संघटनाचा दबदबा होता. ते मोडून काढण्यासाठी काँग्रेस नेतृत्वाने पडद्यामागून शिवसेनेला मदत केली. १९८१ मध्ये शिवसेनेने मुंबई पालिकेवर भगवा फडकवला; मात्र तरीही हिंदी भाषिक, अल्पसंख्याक, दलित मतांच्या भक्कम पाठिंब्यावर काँग्रेसने शहरात आपले स्वतंत्र अस्तित्व राखले; मात्र भाजपचा राजकीय प्रभाव वाढल्यानंतर गुजराती, हिंदी भाषिक मतदारही काँग्रेसपासून दुरावण्यास सुरुवात झाली. मुंबईत पक्षाचा प्रभाव झपाट्याने कमी होत असताना दुसरीकडे संघटना उभारणीचे कुठलेही नियोजनबद्ध प्रयत्न मुंबई काँग्रेसच्या नेतृत्वाकडून झाले नाही.

टर्निंग पॉइंट
१९९६ मध्ये पालिकेत काँग्रेसचे बहुमत असताना, महापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवार पुष्पकांत म्हात्रे यांचा क्रॉस वोटिंगमुळे पराभव झाला व शिवसेनेचे मिलिंद वैद्य महापौर झाले. काँग्रेसमधील अंतर्गत वादाचा हा परिपाक होता. या घटनेनंतर काँग्रेस पक्ष मुंबईत परत उभा राहिला नाही. क्रॉस वोटिंग करणाऱ्यावर पक्षाने कुठलीही कारवाई केली नाही. त्यामुळे संघटनेत गट-तट, अंतर्गत संघर्ष अधिक टोकाला गेला. या चुकांमधून काँग्रेसने काहीच बोध घेतला नाही, असे मुंबईच्या राजकारणाचे अभ्यासक संजय पाटील सांगतात. १९९९ ते २०१४ पर्यंत राज्यात काँग्रेसची सत्ता होती; मात्र तरीही मुंबईत पक्ष संघटना बांधता आली नाही. भाजप-शिवसेनेपुढे पर्याय उभा करता आला नाही, हे मोठं अपयश असल्याचे संजय पाटील सांगतात.

घसरण...
गेल्या ३४ वर्षांचा पालिका निवडणुकांच्या इतिहासावर नजर टाकल्यास १९९१ मध्ये काँग्रेसचे सर्वाधिक म्हणजे १११ नगरसेवक निवडून आले. त्यानंतर २००७ मध्ये काँग्रेसचे ७५ नगरसेवक विजयी झाले. २०१७ मध्ये काँग्रेसच्या नगरसेवकांची संख्या ३१ वर घसरली, ही आतापर्यंतचा सर्वात नीचांकी आकडा होता. १९९१ मध्ये मुंबई पालिकेवर काँग्रेसचा शेवटचा महापौर बसला. त्यानंतर पक्षाची सुरू झालेली घसरण, आजतागायत सुरूच आहे. २००४ मध्ये शरद पवार काँग्रेसमधून फुटून बाहेर निघाले, राष्ट्रवादी काँग्रेसचा उदय झाल्यामुळे काँग्रेसच्या मतांना पाय फुटले.

गट-तट, अंतर्गत संघर्ष
मुंबई प्रदेश काँग्रेसचा इतिहास हा गट-तट, अंतर्गत संघर्षाने भरला आहे. मुरली देवरा हे सर्वाधिक काळ, म्हणजे तब्बल २२ वर्षे मुंबई काँग्रेस अध्यक्ष होते. पक्ष संघटनेवर त्यांचा एकहाती अंमल होता. त्यानंतर गुरुदास कामत, कृपाशंकर सिंग, संजय निरुपम, मिलिंद देवरा, एकनाथ गायकवाड, भाई जगताप हे अध्यक्ष राहिले आहेत. आतापर्यंत मुंबई काँग्रेसवर अमराठी नेत्यांचे वर्चस्व राहिले आहे. संघटना बांधणी, पक्षीय कार्यक्रम देण्याचे कुठलेही प्रयत्न या काळात झाले नाही. अलीकडे भाई जगताप, वर्षा गायकवाड यांच्या कार्यकाळातही ते होताना दिसत नसल्याचे ते सांगतात.

लिटमस टेस्ट
काँग्रेसची संघटना कमकुवत असल्यामुळे विधानसभा, लोकसभा आणि पालिकेच्या निवडणुकीसाठी पक्षाकडे प्रबळ उमेदवारांची वानवा आहे. या वेळी जर काँग्रेस-ठाकरे बंधूंसोबत मिळून लढली असती तर विरोधी पक्षाची मते एकत्रित राहिली असती, त्याचा फटका भाजपला बसू शकला असता, याकडेही राजकीय तज्ज्ञांनी लक्ष वेधले. त्यामुळे या वेळी काँग्रेस मुंबईतले आपले प्रभाव क्षेत्र राखू शकेल का, हा प्रश्न आहे.

मुंबई पालिका निवडणुका - काँग्रेसच्या जागा
२०१७ ३१
२०१२ ५२
२००७ ७५
२००२ ६१
१९९७ ४८
१९९२ १११

परंपरागत मतपेढीच्या पलीकडे विस्तार करण्याचे कुठलेही प्रयत्न काँग्रेस पक्षाने आजपर्यंत केले नाही. राज्य आणि केंद्रात सत्ता असताना मुंबईत पक्ष वाढवण्यात नेतृत्वाला आलेले अपयश. मुळात भाजप-शिवसेनेला आव्हान देण्याचे कुठलेही प्रयत्न काँग्रेसकडून झाले नाहीत. त्यामुळे काँग्रेसच्या परंपरागत जागांवर भाजपने हळूहळू ताबा मिळवला आहे.
- संजय पाटील, राजकीय विश्लेषक

बाबरी मशीद वादानंतर हिंदी भाषिक बेल्टमध्ये झालेले धार्मिक ध्रुवीकरण, बहुसंख्याक वादाचा फटका पक्षाला बसला. भाजपने काँग्रेसला कमकुवत करण्याचे प्रयत्न केले; मात्र २००६ मध्ये काँग्रेसचे मुंबईत सहाच्या सहा खासदार आणि २००५ मध्ये पक्षाचे पाच खासदार विजयी झाले होते, हे विसरू नये. या वेळी वंचितसोबत आघाडी करून आम्ही नव्याने उभारी घेऊ.
- सचिन सावंत, काँग्रेस नेते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com