जुन्या पंचायत समितीच्या इमारतींना घरघर
जुन्या पंचायत समितीच्या इमारतींना घरघर
कोट्यवधींचा निधी वाया; शासन, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
माणगाव, ता. ३१ (वार्ताहर) : शहराच्या मध्यवर्ती भागात उभ्या असलेल्या जुन्या पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारती आज अक्षरशः शेवटच्या घटका मोजत असल्याचे विदारक चित्र आहे. एकेकाळी प्रशासनाच्या गजबजाटाने न्हाऊन निघालेल्या या इमारती आज ओसाड, जीर्ण आणि भयावह अवस्थेत उभ्या असून, शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या निधीची उधळपट्टी होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
विविध शासकीय विभागांसाठी जुन्या इमारती अपुऱ्या पडत असल्याने तहसील कार्यालयाच्या प्रशासकीय संकुलाजवळ अत्याधुनिक व सुसज्ज पंचायत समिती कार्यालयाची उभारणी करण्यात आली. तत्कालीन मंत्री तथा विद्यमान खासदार सुनील तटकरे यांच्या प्रयत्नांतून या संकुलासाठी भरीव निधी उपलब्ध झाला. परिणामी बहुतांश शासकीय कार्यालये एकाच ठिकाणी आल्याने सामान्य नागरिकांची कामे सुलभ, जलद व पारदर्शक झाली. ही बाब निश्चितच स्वागतार्ह असली तरी याचवेळी जुन्या पंचायत समितीच्या इमारतींकडे झालेले दुर्लक्ष प्रशासनाच्या संवेदनशून्यतेचे जिवंत उदाहरण ठरत आहे.
आज या जुन्या आवारात उभ्या असलेल्या अनेक इमारती केवळ नावापुरत्याच अस्तित्वात आहेत. काही ठिकाणी पाणीपुरवठा योजना व आरोग्य विभागाची कार्यालये कार्यरत असली तरी सर्वशिक्षा अभियान, बचत गट कार्यालये, गट साधन केंद्र, कृषी विभाग, बांधकाम विभाग यांसारख्या महत्त्वाच्या इमारती अक्षरशः जीर्ण झालेल्या आहेत. अनेक इमारतींचे छत गळत असून भिंतींना मोठमोठे तडे गेले आहेत, तर काही ठिकाणी लोखंडी सळ्या उघड्या पडल्या आहेत. कधीही इमारत कोसळण्याची भीती येथे वावरणाऱ्या नागरिकांच्या मनात आहे. विशेष म्हणजे अनेक शासकीय कार्यालये आजही खासगी इमारतींमध्ये कोट्यवधी रुपयांचे भाडे देऊन चालवली जात आहेत. डाक पोस्ट कार्यालय, मृदसंधारण विभाग तसेच इतर प्रशासकीय कार्यालये या जुन्या पंचायत समितीच्या इमारती दुरुस्त करून येथे स्थलांतरित केली असती, तर शासनाचा मोठा निधी वाचू शकला असता.
...................
गंभीर बाब म्हणजे इमारती आवारात कोणतेही नियंत्रण नसल्याने अवैधरीत्या वाहने उभी राहतात. मद्यपी राजरोस मद्यप्राशन करीत असून, अस्वच्छता आणि कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. इमारतींवर झाडेझुडपे वाढली असून संपूर्ण परिसराला जंगलाचे रूप आले आहे. रात्रीच्या वेळी हा परिसर भीतीदायक बनत असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. माणगावसारख्या तालुक्याच्या केंद्रस्थानी असलेल्या या मौल्यवान शासकीय मालमत्तेची अशी दुरवस्था होणे म्हणजे लोकांच्या करातून उभ्या राहिलेल्या निधीचा अपमान असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

