थंडीच्या गुलाबी थंडीत रंगल्या ''पोपटी पार्ट्या''

थंडीच्या गुलाबी थंडीत रंगल्या ''पोपटी पार्ट्या''

Published on

गुलाबी थंडीत रंगल्या ‘पोपटी पार्ट्या’
वाड्याच्या ग्रामीण भागात खवय्यांची चंगळ
वाडा, ता. ३१ (बातमीदार) : डिसेंबर महिन्याची गुलाबी थंडी आणि शेतात डोलणाऱ्या तुरीच्या शेंगा हे समीकरण जुळून आले की ग्रामीण भागात वेध लागतात ते पोपटीचे! वाडा तालुक्यातील ग्रामीण भागात सध्या ठिकठिकाणी पोपटी पार्ट्यांची लगबग पाहायला मिळत असून, मित्रपरिवार आणि नातेवाईक रानमाळावर एकत्र जमून या मेजवानीचा मनमुराद आनंद लुटत आहेत.

पोपटी प्रामुख्याने दोन प्रकारे बनवली जाते. शाकाहारी पोपटीमध्ये वाल, तुरीच्या शेंगा, ज्वारी- मक्याचे कोवळे, हिरवे आणि रसदार दाणे, बटाटे, रताळी आणि इतर हिरव्या भाज्यांचा समावेश असतो. तर मांसाहारी पोपटीत शाकाहारी साहित्यासोबतच विशेष मसाला लावलेले चिकन आणि अंडी यांचा वापर केला जातो. पोपटी बनवण्याची पद्धत अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. मातीच्या मडक्यात प्रथमतः भांबुर्ड्याचा (बुराडा) पाला लावला जातो. त्यानंतर शेंगा, भाज्या किंवा चिकनचे थर लावून मडके गच्च भरले जाते. मडक्याचे तोंड पाल्याने बंद करून, हवा बाहेर जाऊ नये म्हणून मातीचा लेप लावला जातो. शेतातील पेंढा किंवा गवताच्या सहाय्याने हे मडके उलटे ठेवून पेटवले जाते. अवघ्या ३० ते ४० मिनिटांत जाळावर ही पोपटी तयार होते. या वेळी सुटणाऱ्या खमंग वासानेच खवय्यांची भूक चाळवली जाते. पोपटीच्या प्रक्रियेतून शिजवलेल्या शेंगा, चिकन आणि अंडी यांची चव खूपच उत्कृष्ट असते. निसर्गाच्या सान्निध्यात मित्रांसोबत किंवा कुटुंबीयांसोबत अशा पार्ट्यांचा आनंद घेणे हा एक अविस्मरणीय अनुभव असतो, अशी प्रतिक्रिया भगीरथ भोईर यांनी दिली.

मैत्री आणि नात्यांची गुंफण
केवळ खाणे हाच उद्देश नसून, शेतघरात किंवा नदीकाठी एकत्र येऊन स्वतःच्या हाताने ही पोपटी तयार करण्यात एक वेगळाच आनंद असतो. जिवलगांसोबत गप्पांच्या ओघात शिजवलेल्या या शेंगा आणि चिकनची चव कोणत्याही हॉटेलच्या जेवणापेक्षा सरस असल्याचे खवय्ये सांगतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com