नववर्ष ठरणार ''प्रगतीचे पर्व''

नववर्ष ठरणार ''प्रगतीचे पर्व''

Published on

नववर्ष ठरणार ‘प्रगतीचे पर्व’
पायाभूत सुविधा, रोजगार आणि पर्यटनाला गती
निखिल मेस्त्री : सकाळ वृत्तसेवा
पालघर, ता. ३१ : नवीन वर्षात पालघर जिल्ह्याच्या विकासाची नवी दारे उघडणार असून दळणवळण, आरोग्य आणि शिक्षणाच्या क्षेत्रात मोठी क्रांती अपेक्षित आहे. केंद्र व राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमुळे जिल्ह्याचा कायापालट होणार असून, दुर्गम पाड्यांपासून ते शहरांपर्यंत विकासाची गंगा पोहोचवण्याचा निर्धार प्रशासनाने केला आहे.

मुंबई-बडोदा एक्स्प्रेस वेच्या एका टप्प्याचे उद्घाटन नवीन वर्षात होणार आहे. यामुळे मुंबई ते गुजरात प्रवासाचा वेळ वाचणार असून, उद्योग व व्यापाराला मोठी चालना मिळणार आहे. उत्तन-विरार सेतूमुळे वसई-विरार आणि मुंबईदरम्यानचा प्रवास सुलभ होईल. वाहतूक कोंडीतून सुटका होऊन वेळ आणि इंधनाची बचत होणार आहे. डहाणू तालुक्यापर्यंतच्या कोस्टल महामार्गाची घोषणा होण्याची शक्यता आहे. यामुळे किनारपट्टी भागातील पर्यटन आणि मासेमारी व्यवसायाला नवी उभारी मिळेल. विरार-डहाणू रेल्वे चौपदरीकरणाचे काम गतीने सुरू असून, डिसेंबर २०२६ पर्यंत ते पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. यामुळे लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी स्वतंत्र मार्गिका उपलब्ध होतील. तसेच वाढती गर्दी लक्षात घेता नवीन वर्षात अधिक लोकल फेऱ्या सुरू होण्याची शक्यता असून, नोकरदार व विद्यार्थीवर्गाला मोठा दिलासा मिळेल.

चौथी मुंबई
देशाचा महत्त्वपूर्ण प्रकल्प असलेल्या हरित वाढवण बंदर प्रकल्पाचे काम नवीन वर्षात अधिक जोमाने सुरू होईल. यामुळे पालघर जिल्हा ‘चौथ्या मुंबई’च्या दिशेने वाटचाल करेल. या प्रकल्पाच्या अनुषंगाने रस्ते आणि पायाभूत सुविधांचे मोठे जाळे विणले जाणार असून, स्थानिक तरुणांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण आणि रोजगाराच्या लाखो संधी उपलब्ध होणार आहेत.

पर्यावरण आणि शाश्वत विकास
हरित पट्टा निर्मिती : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर बांबू लागवड आणि वृक्षारोपणाद्वारे हरित पट्टा निर्माण केला जाणार आहे. यामुळे पर्यावरणाचे रक्षण होईल आणि स्थानिकांना रोजगारही मिळेल.
स्वच्छता मोहीम : शहरी व ग्रामीण भागातील सांडपाणी प्रक्रिया आणि घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांना मंजुरी मिळाल्याने जिल्ह्याचा आरोग्यस्तर उंचावणार आहे.

आदिवासी व मच्छीमार सबलीकरण
आदिवासी समाजाचे जीवनमान उंचावण्यासाठी विशेष आराखडे तयार करण्यात आले आहेत. नवीन वसतिगृहांची निर्मिती आणि शाश्वत मासेमारीसाठी मच्छीमार समुदायाला आधुनिक सोयीसुविधा पुरवण्यावर जिल्हा नियोजन समितीने भर दिला आहे.

देशातील महत्त्वाचा आणि पालघर जिल्ह्याच्या विकासासाठी आवश्यक असलेला वाढवण बंदर प्रकल्प पुढे जात आहे. पालघर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास ही काळाची गरज आहे. पायाभूत सुविधा, औद्योगिक वाढ आणि पर्यावरणपूरक प्रकल्पांमुळे जिल्हा नव्या उंचीवर पोहोचेल. शासनाने हाती घेतलेले प्रकल्प जिल्ह्याच्या भविष्यासाठी आशादायी आहे. शासन आणि प्रशासन यामध्ये दुवा बनून जिल्हावासीयांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा पुरेपूर मानस आहे.
- डॉ. इंदुराणी जाखड, जिल्हाधिकारी, पालघर

ग्रामीण आणि आदिवासी भागातील पायाभूत सुविधा, आरोग्यसेवा, शिक्षण आणि रोजगार निर्मिती यावर अधिक भर देणार आहोत. विकास हा आकडेवारीपुरता मर्यादित न ठेवता ग्रामीण भागात सामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल घडवणारा असेल. पालघर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास ही काळाची गरज आहे. विकासकामांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोचवण्याचे उद्दिष्ट आहे.
- मनोज रानडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने अधिक प्रभावी निर्णय घेतले जातील. जिल्ह्यातील जनता आणि महिला सुरक्षित राहण्याच्या दृष्टीने सुरक्षा यंत्रणा सक्षम करीत आहोत. पोलिस आणि नागरिक यामध्ये सुसंवाद आणि मैत्रीपूर्ण वातावरण राहण्यासाठी पोलिस ठाण्यात वातावरणनिर्मिती केली जाईल. गुन्हेगारी वृत्तीला आळा घालण्यासाठी नियोजन केले जाईल.
- यतिश देशमुख, पोलिस अधीक्षक, पालघर जिल्हा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com