शुक्रवार ठरणार उमेदवारांचे भविष्य
‘बंडोबां’चे आज भवितव्य ठरणार
उमेदवारांची धाकधूक वाढली; माघारीसाठी पक्षश्रेष्ठींची कसरत
वसई, ता. १ (बातमीदार): वसई-विरार शहर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आता केवळ काही तास उरले आहेत. शुक्रवारी (ता. २) हा अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस असल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. पक्षाचे आदेश पाळून कोण माघार घेणार आणि कोण बंडाचे निशाण फडकवणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले असून, इच्छुकांची धाकधूक कमालीची वाढली आहे. महापालिकेच्या ११५ जागांसाठी बहुजन विकास आघाडी, महायुती (भाजप-शिवसेना शिंदे गट-आरपीय-राष्ट्रवादी अजित पवार गट), महाविकास आघाडी (ठाकरे गट-काँग्रेस) आणि मनसे या प्रमुख पक्षांसह अनेक अपक्षांनी दंड थोपटले आहेत. पक्षाने तिकीट नाकारल्याने अनेकांनी अपक्ष म्हणून अर्ज भरले आहेत. त्यामुळे मतविभाजन टाळण्यासाठी पक्षश्रेष्ठींकडून बंडखोरांची मनधरणी केली जात आहे.
महायुती आणि आघाडीमध्ये जागावाटपाचा तोडगा निघाला असला, तरी काही प्रभागांत घटक पक्षांच्या उमेदवारांनी आमनेसामने अर्ज भरले आहेत. यातील कोणाचे पारडे जड ठरणार आणि कोणाला माघार घ्यावी लागणार, याचा फैसला उद्या होणार आहे. अनेक उमेदवार वर्षानुवर्षे प्रभागातील नागरी समस्या, पाणीप्रश्न आणि सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. महापालिकेत सदस्य म्हणून निवडून आल्यास अधिक प्रभावीपणे काम करता येईल, या उद्देशाने त्यांनी अर्ज दाखल केले आहेत. मात्र पक्षांतर्गत समीकरणे आणि एबी फॉर्मच्या घोळामुळे गुरुवारी दिवसभर इच्छुकांच्या गोटात प्रचंड चलबिचल पाहायला मिळाली. शुक्रवारी दुपारी ३ वाजेपर्यंत अनेक नाट्यमय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. कोणाला हिरमोड सहन करावा लागेल आणि कोणाला उमेदवारीचा आशीर्वाद मिळेल, यावरच वसई-विरारच्या सत्तेची पुढील गणिते अवलंबून असतील.
पुढील महत्त्वाचे टप्पे
२ जानेवारी (शुक्रवार) : उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत
३ जानेवारी (शनिवार) : उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध होणार आणि अधिकृत चिन्हवाटप
१५ जानेवारी : प्रत्यक्ष मतदान

