वसई-विरारमध्ये प्रचाराचे रणशिंग फुंकले
वसई-विरारमध्ये प्रचाराचे रणशिंग फुंकले
महापालिकेवर झेंडा फडकवण्यासाठी पक्षांची जय्यत तयारी
प्रसाद जोशी : सकाळ वृत्तसेवा
वसई, ता. १ : वसई-विरार शहर महापालिकेच्या निवडणुकीने आता निर्णायक वळण घेतले आहे. बुधवारी (ता. ३१) उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया पूर्ण झाली असून, आता सर्वांचे लक्ष शुक्रवारकडे लागले आहे. या दिवशी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर निवडणुकीच्या मैदानात नेमके किती पैलवान उरले आहेत, याचे चित्र स्पष्ट होईल आणि खऱ्या अर्थाने प्रचाराची रणधुमाळी सुरू होईल. पक्षाच्या नेत्यांचे दौरे आणि सभांचे नियोजन सुरू झाले आहे. बंडखोर उमेदवारांची समजूत काढण्यासाठी वरिष्ठ नेते सक्रिय झाले असून, शनिवारी मिळणाऱ्या चिन्हांकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.
महापालिकेच्या २९ प्रभागांतील ११५ जागांसाठी तब्बल ९०० हून अधिक इच्छुकांनी नामनिर्देशन पत्रे दाखल केली आहेत. यामध्ये प्रस्थापित पक्षांसह अपक्षांचाही मोठा भरणा आहे. छाननीनंतर आता बंडोबांना थंड करण्याचे आव्हान राजकीय पक्षांपुढे असून शुक्रवारी किती जण माघार घेतात, यावर युती आणि आघाड्यांचे भवितव्य ठरेल.
उमेदवारांची अंतिम यादी आणि चिन्हवाटप शनिवारी (ता. ३) होणार आहे. त्यानंतर रविवारपासून प्रत्यक्ष प्रचाराला वेग येईल. केवळ १२ दिवसांचा अवधी प्रचारासाठी मिळणार असल्याने उमेदवारांनी आतापासूनच मैदाने, होर्डिंग्ज, फलक आणि प्रचार वाहनांसाठी प्रशासकीय परवानग्या घेण्याची लगबग सुरू केली आहे. प्रत्यक्ष भेटीगाठींसोबतच व्हॉट्सॲप आणि फेसबुकच्या माध्यमातून प्रचाराचे नियोजन केले जात आहे. रखडलेली विकासकामे, पाणीप्रश्न आणि स्थानिक समस्या यावर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जाण्याची शक्यता आहे.
रिंगणातील प्रमुख पक्ष
बहुजन विकास आघाडी (बविआ)
महायुती (भाजप + शिवसेना शिंदे गट)
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
स्वराज्य अभियान आणि अन्य अपक्ष

