वसई-विरारमध्ये पथनाट्यांतून मतदानाचा जागर
वसई-विरारमध्ये पथनाट्यांतून मतदानाचा जागर
वसई, ता. १ (बातमीदार) : वसई-विरार शहर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे. मतदानाची टक्केवारी वाढावी आणि लोकशाही बळकट व्हावी, यासाठी महापालिका प्रशासनाने कंबर कसली असून, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सहभागातून संपूर्ण शहरात पथनाट्यांद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. महापालिका आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीपअंतर्गत ही मोहीम राबवली जात आहे. शहरातील प्रमुख वर्दळीची ठिकाणे असलेल्या बोळिंज नाका, कॅपिटल मॉल (नालासोपारा), दत्तानी मॉल (वसई पश्चिम) आणि डी-मार्ट (विरार पश्चिम) या परिसरात ही पथनाट्ये सादर करण्यात आली.
विद्यार्थ्यांनी आपल्या अभिनयातून, विनोदी संवादांतून आणि प्रभावी घोषवाक्यांतून मतदारांना मतदानाचे महत्त्व पटवून दिले. लोकशाही परंपरा मजबूत करण्यासाठी कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता, हयगय न करता आपला मतदानाचा हक्क नक्की बजावा, असे आवाहन करण्यात आले. या पथनाट्यांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, तरुण मतदारांमध्ये विशेष उत्साह दिसून आला.
सेल्फी पॉइंट आणि रॅलीचे आकर्षण
केवळ पथनाट्येच नव्हे, तर प्रशासनाने विविध मार्गांनी मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. जनजागृती करणारे फलक हातात घेऊन विद्यार्थ्यांनी घोषणा देत शहरातून रॅली काढली. तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी ठिकठिकाणी मतदान जनजागृती सेल्फी पॉइंट लावण्यात आले आहेत. प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले, की ही जनजागृती मोहीम मतदानाच्या दिवसापर्यंत म्हणजेच १५ जानेवारीपर्यंत सुरूच राहणार आहे.
प्रशासकीय आवाहन
लोकशाही बळकट करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. आपले एक मत मौल्यवान असून, मतदानादिवशी घराबाहेर पडून ही जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन या वेळी करण्यात आले.

