झरी खाडी पुलाच्या पुनर्बांधणीला वेग
झरी खाडीपुलाच्या पुनर्बांधणीला वेग
तात्पुरता पर्यायी रस्ता खुला; तलासरी-उंबरगाव मार्गावरील ग्रामस्थांना दिलासा
तलासरी, ता. १ (बातमीदार) : पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुका व शेजारील गुजरातमधील उंबरगाव शहराला जोडणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या बोर्डी फाटा-बोरीगाव-नारायण ठाणा मार्गावरील झरी खाडीपुलाच्या पुनर्बांधणीच्या कामाला सध्या वेग आला आहे. या पुलाच्या कामासाठी तयार करण्यात आलेला तात्पुरता पर्यायी रस्ता पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्याने परिसरातील ग्रामस्थ, प्रवासी व वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
हा रस्ता वडवली (झरी खाडी) नदीवरून जातो. या ठिकाणी असलेला जुना पूल अरुंद व उंचीने कमी होता. त्यामुळे पावसाळ्यात नदीला पूर आला की तो पूर्णपणे पाण्याखाली जात असे. परिणामी तलासरी-संजान-उंबरगाव हा महत्त्वाचा दळणवळण मार्ग वारंवार बंद पडत होता. त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. या मार्गावरून दररोज औद्योगिक वसाहतींमध्ये जाणारे कामगार, शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी, व्यापारी तसेच अवजड वाहने प्रवास करतात. विशेषतः गुजरातमधील औद्योगिक कंपन्यांमध्ये कामासाठी जाणाऱ्या कामगारांना पावसाळ्यात १० ते १२ किलोमीटरचा अतिरिक्त फेरा मारावा लागत होता. त्यामुळे वेळ व खर्च दोन्ही वाढत होते. याच पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी अनेक वर्षांपासून जुन्या पुलाच्या जागी उंच, रुंद व मजबूत नवीन पुलाची मागणी लावून धरली होती.
.................
२२ कोटींच्या कामास मंजुरी
या दीर्घकालीन मागणीची दखल घेत महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत झरी खाडी पुलाच्या पुनर्बांधणीस प्रशासकीय व तांत्रिक मान्यता देण्यात आली आहे. ५ जुलै २०२२ रोजी या कामासाठी २२ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता, तर २२ मे २०२३ रोजी १७.२३ कोटी रुपयांची तांत्रिक मान्यता मिळाली आहे. या प्रकल्पांतर्गत २० मीटर अंतराचे सहा गाळे असलेला १२० मीटर लांबीचा आधुनिक पूल उभारण्यात येत आहे. पुलाच्या दोन्ही बाजूंना १६२ मीटर लांबीचे पोहोच रस्ते, माती भराव, खडीकरण, डांबरीकरण व बाजूपट्टीची कामे प्रस्तावित आहेत. हे काम बुकॉन इंजिनिअर्स अँड इन्फ्रास्ट्रक्चर्स प्रा. लि., मुंबई या ठेकेदारामार्फत करण्यात येत असून, निविदा किंमत १२ कोटी ४८ लाख रुपये आहे.
....................
पूरस्थितीतही सुरक्षित पूल
२ मार्च २०२४ रोजी सुरू झालेले हे काम ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. पूर्वीचा पूल अरुंद व कमी उंचीचा असल्याने पावसाळ्यात मोठा त्रास सहन करावा लागत होता. आता उंच व मजबूत नवीन पूल उभारण्यात येत असून, ही समस्या कायमची दूर होईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी उपअभियंता प्रशांत ठाकरे यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

