महापालिका निवडणुकीत मात्तबर उमेदवारांची फौज

महापालिका निवडणुकीत मात्तबर उमेदवारांची फौज

Published on

महापालिका निवडणुकीत मात्तबर उमेदवारांची फौज
दोन माजी महापौर, दोन माजी उपमहापौरांसह अनेक दिग्गज रिंगणात
विरार, ता. १ (बातमीदार) : वसई-विरार शहर महापालिकेच्या आगामी निवडणुकीत आता राजकीय रंगत वाढू लागली आहे. मात्तबर उमेदवारांच्या उपस्थितीमुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरण्याची चिन्हे आहेत. या निवडणुकीसाठी एकूण ९४९ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. छाननीअंती ७५७ उमेदवारी अर्ज पात्र ठरले असून, त्यामध्ये दोन माजी महापौर, दोन माजी उपमहापौर, तीन माजी स्थायी समिती सभापती तसेच अनेक माजी नगरसेवकांचा समावेश आहे.
उमेदवारी अर्ज दाखल होऊनही राजकीय समीकरणे अद्याप अंतिम झालेली नसल्याचे चित्र आहे. शिवसेना ठाकरे गट महाविकास आघाडीत सहभागी होण्याबाबत हालचाली सुरू असल्याचे संकेत मिळत असल्याने, बहुजन विकास आघाडीतील काही दिग्गज उमेदवार अर्ज मागे घेण्याची तयारी करत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत उमेदवारी चित्रात बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीकडून सर्वाधिक माजी पदाधिकाऱ्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये माजी महापौर प्रवीण शेट्टी व रुपेश जाधव, माजी उपमहापौर उमेश नाईक व प्रकाश रोड्रिक्स, तसेच माजी स्थायी समिती सभापती अजीव पाटील व प्रशांत राऊत यांचा समावेश आहे. या दिग्गज उमेदवारांच्या प्रवेशामुळे बहुजन विकास आघाडीने आपली ताकद दाखवून दिल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
................
पक्षांतरांचा प्रभाव, लढती रंगतदार
दुसऱ्या बाजूला बहुजन विकास आघाडीतून भाजपमध्ये गेलेले माजी स्थायी समिती सभापती सुदेश चौधरी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तसेच माजी महिला व बालकल्याण समिती सभापती माया चौधरी यांनी भाजपकडून निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. याशिवाय अनेक माजी प्रभाग समिती सभापती व माजी नगरसेवकांनी पुन्हा एकदा आपले राजकीय नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला आहे. एकूणच अनुभवी, माजी पदाधिकाऱ्यांची मोठी फळी मैदानात उतरल्याने वसई–विरार महापालिका निवडणूक अत्यंत अटीतटीची व लक्षवेधी ठरणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com