प्रत्यक्षात टँकरने पाणीपुरवठ्याची प्रतिक्षा
शहापूरकरांना टँकरने पाणीपुरवठ्याची प्रतीक्षा
१७ कोटींचा टंचाई आराखडा मंजूर
भरत उबाळे : सकाळ वृत्तसेवा
शहापूर, ता. १ : मुंबईची तहान भागवणारी तानसा, भातसा आणि मोडकसागर ही भव्य धरणे ज्या तालुक्यात आहेत, त्याच शहापूरला यंदा डिसेंबरपासूनच भीषण पाणीटंचाईचे चटके बसू लागले आहेत. तालुक्यातील दुर्गम भागातील पाणीटंचाई निवारणासाठी प्रशासनाने १७ कोटी २९ लाख रुपयांचा टंचाई आराखडा मंजूर केला असला, तरी प्रत्यक्षात टँकर सुरू न झाल्याने माता-भगिनींना हंडाभर पाण्यासाठी रणरणत्या उन्हात मैलोनमैल पायपीट करावी लागत आहे.
तानसा, भातसा, मोडकसागर अशी भव्य जलाशये असताना शहापूर तालुकवासीयांची तहान भागवण्यासाठी अन्य म्हणजे इगतपुरी तालुक्यातून तब्बल सव्वातीनशे कोटींची पाणी योजना राबविण्यात येत आहे. धरण उशाला आणि कोरड घशाला, अशी अवस्था असलेल्या शहापूर तालुक्याला वर्षानुवर्षे टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत असून त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च होत आहेत. गेल्या दहा वर्षांत टँकरद्वारे पाणीपुरवठ्यासाठी तब्बल २२ कोटी खर्च झाले असून टंचाई आराखडे हे कायमस्वरूपी उपाय ठरण्याऐवजी ठेकेदारांसाठी वार्षिक उत्सव बनले आहेत.
यंदा पावसाने दीर्घकाळ मुक्काम करूनही पाण्याचे स्रोत लवकर आटल्याने टंचाईची तीव्रता वाढली आहे. ८७ गावे आणि २५१ पाडे अशा एकूण ३३८ गाव-पाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा प्रस्तावित आहे. तर ३६ गावांच्या नळ पाणी योजनांच्या विशेष दुरुस्तीसाठी ७.५ कोटींची तरतूद केली आहे. २३ गावांसाठी ५.५ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. तर २७ पाड्यांमध्ये नवीन विंधण विहिरींसाठी २७ लाखांचा खर्च होणार आहे.
कोट्यवधींचा खर्च; पण प्रश्न कायम
गेल्या १० वर्षांत शहापूरमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठ्यासाठी तब्बल २२ कोटी रुपये खर्च झाले आहेत. तरीही दरवर्षी टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढतच आहे. सव्वातीनशे कोटींची नवी पाणी योजना इगतपुरी तालुक्यातून राबवली जात असली, तरी सध्याची परिस्थिती पाहता टंचाई आराखडे हे कायमस्वरूपी उपाय ठरण्याऐवजी केवळ ‘वार्षिक उत्सव’ बनले आहेत की काय, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
टँकरच्या प्रतीक्षेत ग्रामस्थ
प्रशासकीय पातळीवर १७ कोटींचा आराखडा कागदावर मंजूर झाला असला तरी प्रत्यक्ष टँकर कधी धावणार, याकडे ग्रामस्थांचे डोळे लागले आहेत. गेल्या वर्षी ४४ टँकरद्वारे सव्वातीन कोटी खर्च करून पाणीपुरवठा झाला होता, यंदा ही गरज आणखी वाढणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

