नववर्षाच्या पूर्वसंध्येला वाहतूक पोलिसांच्या नाकाबंदीत अडकले  २२४ तळीराम चालक

नववर्षाच्या पूर्वसंध्येला वाहतूक पोलिसांच्या नाकाबंदीत अडकले २२४ तळीराम चालक

Published on

मद्यपी वाहनचालकांची संख्या घटली
नववर्षात वाहतूक पोलिसांच्या कारवाईचे सकारात्मक परिणाम
ठाणे शहर, ता. १ (बातमीदार) ः थर्टी-फर्स्ट व नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी केलेल्या विविध ठिकाणच्या नाकाबंदीचा चांगला परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. मद्यपींच्या हॉटस्पॉटच्या ठिकाणी लावलेला चोख बंदोबस्त आणि कारवाईबाबत लोकांमध्ये जागृती केल्याने यंदाच्या नववर्षाच्या पूर्वसंध्येला मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांची संख्या सुमारे शंभरने घटली आहे. ठाणे पोलिस आयुक्तालय क्षेत्रात यंदा थर्टी-फर्स्ट आणि नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर लावलेल्या नाकाबंदी तपासणीत अवघे २२४ वाहनचालक मद्य पिऊन वाहन चालविण्याच्या गुन्ह्यात आढळून आली आहेत. गेल्या वर्षी ही संख्या ३१२वर होती.
थर्टी-फर्स्ट आणि नववर्षाच्या दोन दिवसांत ठाणे वाहतूक विभागाने पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत कडक नाकाबंदी करीत कर्मचाऱ्यांचा मोठा फौजफाटा रस्त्यावर उतरविला होता. यासोबतच बार, हॉटेल, वाईन शॉप, ढाब्यांवर नजर ठेवली होती. दारू पिणाऱ्या ग्राहकाला घरी पाठवण्याची जबाबदारी मद्यविक्रेत्यांवर दिली होती. या सर्व गोष्टींचा चांगला परिणाम दिसून आला असून, गत वर्षाच्या तुलनेत यंदा दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांची संख्या कमी झालेली दिसून आली. पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे, सहपोलिस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या निर्देशानुसार वाहतूक शाखेत नऊ अधिकारी आणि ६८० कर्मचारी असे एकूण ७३९ इतक्या मनुष्यबळाच्या साथीने एकूण ५४ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. दरम्यान, ठाणे, डोंबिवली, कल्याण, विठ्ठलवाडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि भिवंडी शहरांतील ३५ पोलिस ठाण्यांतर्गत एकूण १८ वाहतूक उपविभाग कार्यरत आहेत.

३१ डिसेंबरच्या रात्री केलेल्या कारवाया
ठाणे - ५९, वागळे - ३३, भिवंडी - ४९, कल्याण - ६५, उल्हासनगर - ३०

मद्यपींसोबत प्रवास करणारेही अडचणीत
दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांच्या वाहनातून प्रवास करणाऱ्या इतर १२ जणांवरही पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. या लोकांनी मद्यप्राशन केले नसले तरी मद्यपींसोबत प्रवास केल्याने त्यांच्यावर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.

कसूरवारांवर न्यायिक कारवाई
कारवाई करण्यात आलेल्या कसूरवार मद्यपींना आता पुढील दंडात्मक कारवाईसाठी न्यायालयीन प्रक्रियेचा सामना करावा लागणार आहे. वाहतूक विभागाकडून त्यांना न्यायालयात सादर करण्यात येणार असून, न्यायालयाच्या आदेशाने दंड भरावा लागणार आहे.

यंदा वाहतूक विभागाकडून थर्टी-फर्स्ट आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर चोख बंदोबस्त ठेवला होता. जनजागृतीसोबतच वर्षभरातील कसूरवार मद्यपींचे वाहतूक दलामार्फत समुपदेशन प्रशिक्षण घेण्यात आले होते. या सर्वांना चांगला प्रतिसाद मिळाल्याने यंदा मद्यपी वाहनचालकांच्या संख्येत घट झाल्याचे दिसले.
- पंकज शिरसाट, पोलिस उपायुक्त, वाहतूक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com