निवडणुकीवर तिसऱ्या डोळयाची नजर
निवडणुकीवर तिसऱ्या डोळ्याची नजर
३३० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे वॉच
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १ : निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची कार्यालये, प्रभागनिहाय स्ट्राँग रूम, ईव्हीएम मिशनिंगची ठिकाणे, साहित्य वाटप केंद्र, संवेदनशील व अति संवेदनशील मतदान केंद्रे, मतमोजणी केंद्रे, मुख्य स्ट्राँग रूम तसेच शहरातील प्रमुख चेक पोस्टवर ठाणे महापालिकेकडून ३३० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. आगामी महापालिका निवडणूक प्रक्रियेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ही खबरदारी घेण्यात येत आहे.
महापालिका आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी सौरभ राव यांच्या निर्देशानुसार हे काम सुरू असून, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलबजावणी होत आहे. या संपूर्ण सीसीटीव्ही व्यवस्थेसाठी उपायुक्त मनीष जोशी यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, प्रभागनिहाय स्ट्राँग रूम व आरओ कार्यालयांमध्ये कॅमेरे बसविण्याचे काम पूर्ण करण्यात आले असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. माजिवडा-मानपाडा प्रभाग कार्यालय व न्यू होरायझन स्कूल, हिरानंदानी इस्टेट येथील स्ट्राँग रूममध्ये ५२, वर्तकनगर ४३, लोकमान्यनगर ३१, वागळे आयटीआय २५, नौपाडा-कोपरी कार्यालय आणि ठाणा कॉलेज येथील स्ट्राँग रूममध्ये २६, उथळसर २४, कळवा प्रभाग कार्यालय आणि सह्याद्री शाळेतील स्ट्राँग रूममध्ये १२ कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
मुंब्रा २६ ते ३२ प्रभाग आणि दिवा २७ ते ३३ प्रभाग परिसरातही मोठ्या प्रमाणावर कॅमेरे लावले असून, एकूण २९५ कॅमेरे सध्या कार्यरत आहेत. याशिवाय डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, बेथनी हॉस्पिटलच्या बाजूला असलेली मुख्य स्ट्राँग रूम येथे ३० कॅमेरे लावण्यात आले आहेत. प्रभागनिहाय साहित्य वाटपाचे मुख्य केंद्र असलेल्या टाऊन हॉल येथे एक कॅमेरा, तर मॉडेला व श्रीनगर चेक पोस्ट नाक्यांवर प्रत्येकी दोन कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे कार्यान्वित सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या ३३० झाली आहे.
कॅमेऱ्याचे थेट निरीक्षण
स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात आलेल्या ईव्हीएम मशिन्सच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक प्रभागात विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. कॅमेऱ्यांचे थेट निरीक्षण करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना स्वतंत्र युजर आयडी व पासवर्ड देण्यात आले आहेत. या संपूर्ण व्यवस्थेवर उपायुक्त मनीष जोशी यांचे थेट लक्ष आहे.
११ अधिकारी ठेवणार लक्ष
निवडणूक काळात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर अखंड नजर ठेवण्यासाठी ११ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयनिहाय शहर विकास विभागाकडील ११ भूमापकांची नियुक्ती करण्यात आली आहे. आवश्यकतेनुसार कंत्राटदारामार्फत नवीन कॅमेरे बसवून ते तत्काळ कार्यान्वित करण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. तांत्रिक यंत्रणेच्या देखरेखीकरिता उपायुक्त मनीष जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता वामन सखदेव, कार्यकारी अभियंता शशिकांत साळुंखे तसेच उपअभियंता अतुल भोळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मुख्य कमांड सेंटर
ठाणे महापालिका मुख्यालयात मुख्य कमांड सेंटर कार्यान्वित करण्यात येणार असून येथून सर्व सीसीटीव्ही कॅमेरांचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येणार आहे. या व्यापक व्यवस्थेमुळे निवडणूक प्रक्रिया अधिक कडक नियंत्रणाखाली राहणार असून, गैरप्रकारांना आळा बसणार असल्याचे आयुक्त सौरभ राव यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

