मंदिरे भाविकांनी गजबजली!

मंदिरे भाविकांनी गजबजली!

Published on

मंदिरे भाविकांनी गजबजली!
देवदर्शनाने केले वर्षाच्या पहिल्‍या दिवसाचे स्‍वागत
मुंबई, ता. १ ः नव्या वर्षाची पहिली सकाळ देवदर्शनाने व्हावी, या भावनेतून मुंबईतील विविध मंदिरांमध्ये मध्यरात्रीपासूनच भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. गुरुवार असल्याने अनेक नागरिकांनी पहाटेपासूनच मंदिरांमध्ये दर्शन घेण्यास प्राधान्य दिले.
दादर येथील सिद्धिविनायक मंदिर, महालक्ष्मी मंदिर, मुंबादेवी मंदिर, बाबुलनाथ तसेच स्वामी समर्थ मठ आदी प्रमुख देवस्थानांमध्ये भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळाली. देवदर्शनाच्या निमित्ताने अनेक मंदिरे आकर्षक पद्धतीने सजवण्यात आली होती. पहाटेपासून दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाच्या आशीर्वादाने नववर्षाची सुरुवात करण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. सिद्धिविनायक न्यासाकडून भाविकांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. महिला, पुरुष, मुले तसेच कुटुंबांसाठी स्वतंत्र रांगा ठेवण्यात आल्या होत्या. पहाटे १.३० वाजल्यापासून दर्शनास सुरुवात झाली असून, संध्याकाळपर्यंत अविरत दर्शन सुरू होते.
मंदिराच्या प्रत्येक प्रवेशद्वारावर कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मंदिर प्रशासन, पोलिस, मुंबई महापालिका, अग्निशमन दल तसेच स्वयंसेवी संस्थांच्या सेवेकऱ्यांनी चोख व्यवस्था सांभाळली. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या गजराने संपूर्ण मंदिर परिसर भक्तीमय झाला होता. भाविकांनी आरोग्यदायी, समृद्ध आणि अपेक्षापूर्ण वर्ष जावे, अशी प्रार्थना केली. अनेकांनी पहाटेपासून दोन ते तीन तास रांगेत उभे राहून दर्शन घेतले. दरम्यान, महालक्ष्मी मंदिरातही दिवसभर मोठी गर्दी अनुभवायला मिळाली. दीड ते दोन तास प्रतीक्षेनंतर भाविकांना दर्शन मिळत होते. लाखो भाविकांनी नववर्षाच्या पहिल्या दिवशी देवदर्शन घेतल्याचे चित्र मुंबईभर पाहायला मिळाले.

भाविकांच्या प्रतिक्रिया
विलेपार्ले येथून आलेल्‍या वर्षा विजय चव्हाण म्‍हणाल्‍या, मी सकाळी ११.३० स्वामी समर्थ मठात गेले होते. गर्दीची कल्पना होती, त्यामुळे तयारीने गेले. प्रशासनाची व्यवस्था उत्तम होती; मात्र दर्शनासाठी सुमारे दोन तास लागल्‍याचे त्‍यांनी सांगितले. बोरिवलीतील स्नेहल आगरे म्‍हणाल्‍या, आम्ही काल रात्रीपासून रांगेत उभे होतो. सकाळी ५ वाजता दर्शन झाले. दरवर्षी कुटुंबासह पहिल्या दिवशी दर्शन घेतो. व्यवस्था शिस्तबद्ध होती, असे त्‍यांनी सांगितले. विरार येथून कुटुंबासह आलेल्‍या मानसी आगरे यांनी सांगितले, की वर्षाच्या पहिल्या दिवशी कुटुंबासह प्रमुख मंदिरांमध्ये दर्शन घेतल्याने वर्षभर ऊर्जा मिळते. आम्ही सिद्धिविनायक, महालक्ष्मी, मुंबादेवी, बाबुलनाथ आणि स्वामी मठ अशी देवदर्शने केली, असे त्‍यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com