नगराध्यक्षा तेजश्री करंजुले यांचा आज पदग्रहण सोहळा
अंबरनाथ, ता. १ (वार्ताहर) : शहराच्या प्रथम नागरिक म्हणून नवनिर्वाचित नगराध्यक्षा तेजश्री करंजुले या शुक्रवारी (ता. २) अधिकृत पदाची सूत्रे हाती घेणार आहेत. हा पदग्रहण समारंभ सकाळी १० वाजता नगरपालिका कार्यालयात पार पडणार आहे. राज्यातील अनेक नामवंत राजकीय नेत्यांच्या उपस्थितीमुळे हा सोहळा विशेष लक्षवेधी ठरणार आहे.
समारंभाला भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा आमदार चित्रा वाघ, मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे, विधान परिषदेचे आमदार निरंजन डावखरे, उल्हासनगरचे आमदार कुमार आयलानी तसेच कल्याण पूर्वच्या आमदार सुलभा गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. याशिवाय माजी आमदार नरेंद्र पवार, जिल्हा निवडणूक प्रमुख नरेंद्र सूर्यवंशी, जिल्हाध्यक्ष नंदकिशोर परब, महिला जिल्हाध्यक्षा रेखा चौधरी यांच्यासह अनेक मान्यवर नगराध्यक्षांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. नुकत्याच पार पडलेल्या थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपच्या तेजश्री करंजुले यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. त्यांच्यासोबत भाजपचे १४ नगरसेवक निवडून आले आहेत. युतीबाबत अंतिम निर्णय झाल्यानंतरच उपनगराध्यक्ष व विविध विषय समित्यांच्या सभापतींची निवड होणार आहे.
चर्चेला उधाण
पदग्रहण सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेत शिवसेनेच्या नेत्यांची नावे नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. यासंदर्भात शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांनी आपण सध्या बाहेरगावी असून अद्याप निमंत्रण मिळाले नसल्याचे सांगितले. तर माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनी हा कार्यक्रम शासकीय स्वरूपाचा असल्याने कदाचित नेत्यांची नावे नमूद केली नसावीत, असे स्पष्टीकरण दिले.
युती कायम
राज्यात महायुतीचे सरकार असल्याने अंबरनाथमध्येही युती कायम ठेवण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, आमदार डॉ. बालाजी किणीकर आणि माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांच्यात सकारात्मक चर्चा झाली आहे. या चर्चेचा अहवाल खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे सादर केला जाणार आहे. अंतिम निर्णय त्यांच्या स्तरावर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

