५१ टक्क्यांचा फॉर्म्युला, बुथवर लढाई

५१ टक्क्यांचा फॉर्म्युला, बुथवर लढाई

Published on

उल्हासनगर, ता. १ (वार्ताहर) : उल्हासनगर महापालिका निवडणूक ही केवळ सत्तेची लढाई नसून ती कार्यकर्त्यांच्या सन्मानाची आणि राजकीय अस्तित्वाची परीक्षा आहे, असे प्रतिपादन करत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी उल्हासनगरात कार्यकर्त्यांना विजयाचा स्पष्ट फॉर्म्युला दिला. ५१ टक्क्यांची लढाई जिंका, बुथवर लक्ष ठेवा आणि वेळ वाया घालवू नका, महापौर भाजपचाच असेल, असा कानमंत्र देतानाच लेटलतिफांवर त्यांनी जाहीर कानपिचक्या दिल्या. स्वबळावर लढणाऱ्या भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असल्याचेही त्यांनी ठणकावून सांगितले.
नगर परिषद निवडणुकीमध्ये ठाणे जिल्ह्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आता उल्हासनगर महापालिका निवडणुकीतही विजयाचे गणित स्पष्ट केले आहे. स्वबळावर लढणाऱ्या भाजपसाठी ही निवडणूक अत्यंत निर्णायक आहे. प्रत्येक बुथवर काटेकोर नियोजन आणि शिस्तबद्ध काम करण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी गुरुवारी सकाळी उल्हासनगरात उपस्थित राहून रवींद्र चव्हाण यांनी पदाधिकारी, उमेदवार आणि कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला. या वेळी त्यांनी केवळ मार्गदर्शनच केले नाही, तर कामातील त्रुटींवर थेट बोट ठेवत कार्यकर्त्यांना सजग राहण्याचा इशाराही दिला.

‘विजय मंत्र’
ही लढाई सभागृहात नाही, तर बुथवर जिंकायची आहे. प्रत्येक प्रभागातील रचना, मतदारांची मानसिकता पदाधिकाऱ्यांनी नीट समजून घेतली पाहिजे. घराघरात पोहोचा, मतदारांशी थेट संवाद साधा आणि ५१ टक्क्यांचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवा, असे विरोधकांवर टीका करताना रवींद्र चव्हाण यांनी, विरोधातील आघाड्या या केवळ स्वार्थासाठी एकत्र आल्या आहेत. ही बाब मतदारांपर्यंत पोहोचवली पाहिजे, असे सांगितले.

वाद १७ जानेवारीनंतर
कार्यकर्त्यांमधील अंतर्गत मतभेदांवर भाष्य करताना रवींद्र चव्हाण यांनी पदाधिकाऱ्यांना हात जोडून विनंती केली. उमेदवार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये जे काही मतभेद असतील, ते १७ जानेवारीनंतर पाहू. आत्ता कोणतेही वाद नकोत. पूर्ण लक्ष निवडणुकीवर द्या, असे ते म्हणाले. बंडखोरी करणाऱ्यांबाबतही त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली. बंडखोरांना शांत करा, अर्ज मागे घेण्यासाठी प्रयत्न करा. सत्ता आपली आहे, योग्य वेळी योग्य सन्मान दिला जाईल, हे त्यांना ठामपणे सांगा, असे निर्देश त्यांनी दिले.


लेट येणाऱ्यांना सुनावले
बैठकीची वेळ सकाळी १२ वाजता निश्चित असताना प्रत्यक्षात बैठक दुपारी १ वाजता सुरू झाल्याने रवींद्र चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली. “मी साडेअकरालाच आलो होतो. दीड तास उशीर झाला, म्हणजे तुमचा आणि माझा दीड तास वाया गेला, असे सांगत त्यांनी पदाधिकारी आणि उमेदवारांना स्पष्ट शब्दांत सुनावले. आता फक्त १५ दिवस उरले आहेत. वेळेची किंमत ओळखा. वेळेत मतदारांपर्यंत पोहोचलात, तरच स्वबळावर भाजपचा महापौर बसू शकतो, असा ठाम इशाराही त्यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com