आता महापालिकेचे दरवाजे बंद करा

आता महापालिकेचे दरवाजे बंद करा

Published on

आता महापालिकेचे दरवाजे बंद करा
रवींद्र चव्हाण यांची हितेंद्र ठाकूरांवर टीका
नालासोपारा, ता. १ (बातमीदार) ः एक काळ असा होता की सुकेळी, चाफा, पापलेट अशी वसईची ओळख होती. आता ती ओळख भ्रष्टाचार अशी झाली आहे. या महापालिका निवडणुकीत बहुजन विकास आघाडीला मतदान केले, तर या भागाचा विकास कधीच चांगला होणार नाही. आजही भीती, दहशत, गुंडागर्दी, दादागिरी या परिसरात आहे. हे सर्व संपविण्यासाठी येथील जनतेने लोकसभा, विधानसभेचे दार बंद केले. आता महापालिकेचे दरवाजे बंद करा, असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी हितेंद्र ठाकूर यांचे नाव न घेता कार्यकर्त्यांना करून, महापालिकेचे दार बंद होताच ते वसई-विरारमध्ये न राहता परदेशात जाऊन राहतील, असा टोलाही ठाकूर यांना लगावला.

वसई-विरार महापालिका निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ गुरुवारी (ता. १) भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी वसईच्या माणिकपूर येथील वायएमसी सभागृहात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात हे वक्तव्य केले. या मेळाव्यात पक्षाच्या महापालिका मुख्य निवडणूक प्रमुख पूनम महाजन, निवडणूक प्रभारी खासदार हेमंत सवरा, आमदार राजन नाईक, आमदार स्नेहा पंडित दुबे, जिल्हाध्यक्षा प्रज्ञा पाटील यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

या वेळी रवींद्र चव्हाण यांनी महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला. या वेळी चव्हाण म्हणाले, की ही लढाई फक्त नगरसेवक होण्यासाठी नाही तर अस्तित्वाची आहे. पाच वर्षांत एकदा निवडणूक होणार आहे. त्यामुळे ही पालिका महायुतीच्या हातात द्या. नरिमन पॉइंटवरून कोस्टल रोड निघालाय, पण वसई-विरारपर्यंत येण्याची वाट पाहतोय. त्यामुळे कमळाचे बटण दाबा आणि विकासाला साथ द्या. मतदानाला बाहेर पडताना कुणालाही घाबरू नका. आम्ही आणि मुख्यमंत्री तुमच्या पाठीशी आहेत, असा विश्वासही दिला.

गंभीर आरोप
कार्यक्रम संपवून रवींद्र चव्हाण यांचा ताफा निघाला असता, नायगाव जूचंद्र येथील भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते निशिकांत म्हात्रे यांनी वसईच्या आमदार स्नेहा पंडित दुबे यांच्यावर गंभीर आरोप केले. महापालिका तिकीट वाटपात निष्ठवंतांना डावलले. पैसे घेऊन चाळमाफियांना तिकिटांचे वाटप केले. आम्हाला सावत्र आमदार भेटल्या, असा आरोप केला आहे. यावर आ. स्नेहा पंडित दुबे यांना विचारले असता, त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com