महापालिका निवडणुकीचा ‘आभासी आखाडा’
महापालिका निवडणुकीचा ‘आभासी आखाडा’
कमी वेळेत अधिक लोकापर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य; कलाकार-अँकर्सचे ‘कमबॅक’
नितीन बिनेकर : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात दोन हजारांहून अधिक उमेदवार उतरले आहेत. तंत्रज्ञानामुळे जग बदलले आहे. त्यामुळे निवडणूक केवळ प्रभागातील सभा, पोस्टर, झेंडे किंवा रॅलीपुरती मर्यादित राहिलेली नाही. डिजिटल माध्यमांनी प्रचाराचे संपूर्ण गणित बदलून टाकले असून राजकारण आता थेट मोबाईलच्या स्क्रीनवर उतरले आहे. या बदलत्या प्रचारतंत्रामुळे मुलाखतदार, अँकर आणि रील्स कलाकारांना ‘अच्छे दिन’ आले आहेत.
पूर्वी उमेदवारांना प्रसिद्धी मिळवण्यासाठी मुख्य प्रवाहातील वृत्तपत्रे, टीव्ही चॅनेल्स किंवा मोठ्या सभांवर अवलंबून राहावे लागत होते. आता अनेक उमेदवारांनी स्वतःचे यूट्युब चॅनेल सुरू केले आहेत. त्या माध्यमातून ते जनतेशी थेट संवाद साधत आहेत. या चॅनेल्सवर उमेदवारांच्या मुलाखती, विकासकामांचा आढावा, भविष्यातील आराखडे तसेच वैयक्तिक प्रतिमा तयार करण्यावर भर दिला जात आहे. महत्त्वाचे म्हणजे या मुलाखती अधिक प्रभावी आणि व्हायरल व्हाव्यात म्हणून व्यावसायिक मुलाखतदार, अनुभवी अँकर तसेच प्रसिद्ध कलाकारांची मदत घेतली जात आहे. त्यामुळे मराठी आणि बॉलीवूडमधील कलाकार, ज्युनियर आर्टिस्ट, रंगभूमीवरील कलाकार तसेच फ्रीलान्स मुलाखतदारांना मोठ्या प्रमाणावर काम मिळू लागले आहे.
मानधन पाच ते २५ हजारांपर्यंत
विशेष म्हणजे, या मुलाखतींसाठी आता ठरावीक दरही निश्चित झाले आहेत. उपलब्ध माहितीनुसार, एका मुलाखतीसाठी पाच हजारांपासून ते २५ हजार रुपयांपर्यंत मानधन दिले जात आहे. कलाकारांची ओळख, मुलाखतदाराचा अनुभव, चित्रीकरणाचा दर्जा तसेच व्हिडिओ किती लाेकांपर्यंत पाेहोचण्याची शक्यता यावर हे दर ठरत आहेत. काही उमेदवार तर एकाच वेळी दोन ते तीन मुलाखती चित्रित करून त्या वेगवेगळ्या समाजमाध्यमांच्या मंचावर प्रसिद्ध करीत आहेत.
प्रचारासाठी स्वतंत्र डिजिटल टीम
काही प्रभागांत उमेदवारांनी निवडणूक प्रचारासाठी स्वतंत्र डिजिटल टीम तयार केली आहे. स्क्रिप्ट लेखन, प्रश्नांची आखणी, चित्रीकरण, एडिटिंग, थंबनेल डिझाइन तसेच समाजमाध्यमांवर नियोजनबद्ध प्रसार अशी संपूर्ण प्रक्रिया व्यावसायिक पद्धतीने राबवली जात आहे. त्यामुळे राजकीय प्रचार हा आता छोट्या ‘डिजिटल शो’ किंवा वेब कार्यक्रमाचे स्वरूप घेत असल्याचे चित्र दिसत आहे.
राजकारणासोबत रोजगारालाही चालना
या बदललेल्या परिस्थितीत एकीकडे उमेदवारांना थेट मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रभावी मार्ग मिळाला आहे, तर दुसरीकडे कलाकार, अँकर आणि मुलाखतदारांसाठी ही निवडणूक रोजगाराची मोठी संधी ठरत आहे. मुंबई महापालिकेची ही निवडणूक केवळ राजकारणापुरती मर्यादित न राहता डिजिटल माध्यमे आणि मनोरंजन क्षेत्रालाही चालना देणारी ठरत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.
प्रतिक्रिया
पालिका निवडणुकीच्या काळात मुलाखतीसाठी आमच्याकडे विचारणा होत आहे. हल्ली मी एका नगरसेवकाची मुलाखत घेतली आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने आर्थिक आधार मिळाला आहे.
- शैलेंद्र नगराळे, कलाकार
.......
पालिका निवडणुकीमुळे सध्या कलाकार आणि व्हिडिओ शूट करणाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर काम मिळत आहे. उमेदवारांचा प्रचार आता कॅमेऱ्याभोवती फिरतो आहे. एका मुलाखतीसाठी कलाकार, कॅमेरामन आणि एडिटर सगळ्यांची गरज भासते. ही निवडणूक आमच्यासारख्यांसाठी रोजगाराची संधी घेऊन आली आहे.
- चेतन कोलगे, कलाकार
एवढ्या कमी वेळेत मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रभावी व कमी खर्चीक पर्याय असल्यामुळे या वेळी डिजिटल प्रचाराला आम्ही जास्त प्राधान्य देत आहोत.
- एक उमेदवार
....
कसा चालतो डिजिटल प्रचार?
- प्रचार कार्यालयात छोटे स्टुडिओ उभारले जात आहेत. मोबाईल कॅमेरे, रिंग लाइट, माइक आणि बॅनरच्या साहाय्याने तात्पुरते सेट तयार केले जातात.
- अनुभवी आणि ओळखीच्या अँकरकडून मुलाखती घेतल्या जातात. मुलाखतीपूर्वी प्रश्नोत्तरांची तयारी करून घेतली जाते.
- मुलाखतीतील महत्त्वाचे मुद्दे वेगळे काढून विविध वयोगटांसाठी क्लिप्स/रील्स, सोशल मीडियावर व्हायरल केले जातात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

