पिस्टल-काडतुसासह तरुणाला अटक; ३ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी
पिस्टल-काडतुसासह एकाला अटक
ठाणे, ता. २ : नववर्षाच्या पूर्वसंध्येला ठाणे गुन्हे शाखा घटक एकने अवैधरीत्या पिस्टल-काडतूस बाळगणाऱ्या कळवा-खारीगावातील फिलीप पिटर तुर्का (वय २७) याला अटक केली. त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. त्याला शनिवार (ता. ३) जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी मिळाली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
बुधवारी (ता. ३१) पोलीस उपनिरीक्षक दीपक घुगे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ठाणे, रेतीबंदर रोड येथे सापळा रचण्यात आला. ठाणे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सापळ्यात फिलीप तुर्का हा संशयास्पद हालचाली करताना आढळला. त्याला ताब्यात घेत अंगझडतीत त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे मिळाली. त्याला तत्काळ अटक करण्यात आली. याप्रकरणी राबोडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास गुन्हे शाखा घटक एकचे पोलिस उपनिरीक्षक रवींद्र पाटील करीत आहेत.

