वासुन्द्री रस्त्यावरील जीवघेणा खड्डा
वासुन्द्री रस्त्यावरील जीवघेणा खड्डा
अपघाताला आमंत्रण, नागरिकांमध्ये संताप
टिटवाळा, ता. ३ (वार्ताहर) : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीतील टिटवाळा पश्चिमेकडील वासुन्द्री मुख्य रस्त्यावर पुन्हा एकदा निष्काळजीपणाचा कारभार उघडकीस आला आहे. जून-जुलै महिन्यात याच रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघाताची भीती निर्माण झाल्याची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर तात्पुरती डागडुजी करण्यात आली होती. मात्र, पावसाचे पाणी जाण्यासाठी टाकण्यात आलेल्या चेंबरचे झाकण आता तुटल्याने रस्त्याच्या मधोमध मोठा खड्डा पडला आहे. हा खड्डा वाहनचालक व पादचाऱ्यांसाठी जीवघेणा ठरत आहे.
वासुन्द्री हा रस्ता दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. येथील गणेश प्रतिमा सोसायटी चौक, जानकी विद्यालय परिसर या ठिकाणी दुचाकी, रिक्षा आणि चारचाकी वाहनांची मोठी वर्दळ असते. परंतु, या रस्त्यावर चेंबरचे झाकण तुटल्याने मोठा खड्डा पडला असून अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी हा खड्डा वाहनचालकांच्या सहज लक्षात येत नसल्याने एखादी मोठी दुर्घटना घडण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, यापूर्वी खड्डा बुजवण्याऐवजी केवळ वरवरची मलमपट्टी करण्यात आली होती. पावसाचे पाणी साचू नये म्हणून चेंबर बसवण्यात आले, मात्र दर्जाहीन झाकण व योग्य देखभाल न झाल्याने काही दिवसांतच चेंबरचे झाकण तुटले आहे. परिणामी रस्त्याची अवस्था ‘आगीतून फुफाट्यात’ अशी झाली आहे. खड्ड्यात अडकून दुचाकी घसरल्याच्या, रिक्षांचे चाक रुतल्याच्या घटना घडत असल्याचेही नागरिकांनी सांगितले आहे.
पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम व ड्रेनेज विभागाकडून अद्याप कायमस्वरूपी दुरुस्ती करण्यात आलेली नाही. अपघात घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का? असा संतप्त सवाल नागरिक विचारत असून तत्काळ मजबूत झाकण बसवून संपूर्ण रस्ता योग्य पद्धतीने दुरुस्त करण्याची मागणी जोर धरत आहे.
या ठिकाणी त्वरित संरक्षक उपाययोजना, सूचना फलक आणि रात्रीसाठी प्रतिबिंबक चिन्हे लावणे गरजेचे असतानाही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. वेळेत ठोस पावले उचलली नाहीत तर वासुन्द्री रस्त्यावरील हा खड्डा एखाद्या गंभीर अपघाताचे कारण ठरण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

