मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा कल्याण तालुक्यात प्रभावी आढावा

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा कल्याण तालुक्यात प्रभावी आढावा

Published on

मुख्यमंत्री पंचायतराज अभियानाची कल्याण तालुक्यात पाहणी
लोकसहभागातून राबविलेल्या कामांचे अधिकाऱ्यांकडून कौतुक
वनराई बंधारे, घरकुल, आरोग्यसेवा व सौरऊर्जेच्या कामांचा प्रत्यक्ष आढावा
टिटवाळा, ता. ३ (वार्ताहर) ः ग्रामीण भागातील सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी सरकार मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवत आहे. याच अभियानांतर्गत कल्याण पंचायत समितीच्या वतीने दहागाव-बांधणेपाडा ग्रामपंचायत हद्दीत प्रत्यक्ष भेट देत विविध विकासकामांचा सखोल आढावा घेतला.
या पाहणी दौऱ्यात कल्याण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रघुनाथ गवारी, अभियानाचे सदस्य संजय कांबळे, कृषी विस्तार अधिकारी एस. एस. संत, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आशा मुंजाळ, बालविकास अधिकारी उषा लांडगे, माजी सरपंच अरविंद मिरकुटे, ग्रामपंचायत अधिकारी गजानन कुटेमाटे यांच्यासह ग्रामस्थ, शिक्षक व शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सूचनेनुसार दहागाव-बांधणेपाडा ग्रामपंचायत हद्दीत तीन वनराई बंधारे उभारून अभियानाची प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली. या वेळी अधिकाऱ्यांसह माजी सरपंच अरविंद मिरकुटे, आरोग्य विभागाचे कर्मचारी सांबरे, गौरव सुराडकर, आशा वर्कर, जागृत विद्यालयाचे विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक, ग्रामपंचायत अधिकारी गजानन कुटेमाटे, समितीचे सदस्य संजय कांबळे आणि ग्रामस्थांनी प्रत्यक्ष पाण्यात उतरून गोण्याचा बांध घालत श्रमदान केले. यातून लोकसहभागाची प्रभावी झलक पाहायला मिळाली. यानंतर प्रधानमंत्री जनमन योजनेअंतर्गत सुरू असलेल्या अंगणवाडीच्या खोदकामाची पाहणी करण्यात आली. तसेच वैयक्तिक लाभाच्या जांभूळ लागवडीच्या कामाची तपासणी करून लाभार्थ्यांना आवश्यक मार्गदर्शन देण्यात आले. दहागाव-बांधणेपाडा ग्रामपंचायतीने राबविलेल्या विविध विकासकामांचे कौतुक करीत, इतर ग्रामपंचायतींनीही अशाच पद्धतीने नियोजनबद्ध आणि लोकसहभागातून कामे करावीत, असे आवाहन गटविकास अधिकारी गवारी यांनी केले. या दौऱ्यानंतर तालुक्यातील इतर ग्रामपंचायतींनाही भेट देत वनराई बंधारे व विकासकामांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

आरोग्य सेवांबाबत सविस्तर माहिती
प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ. पूनम जयकर यांनी गरोदर, स्तनदा माता, हिमोग्लोबिन तपासणी, कुष्ठरोग तपासणी, सिकल सेल तपासणी अशा विविध आरोग्यसेवांबाबत सविस्तर माहिती दिली. आरोग्य सुविधांचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले.

शून्य वीजबिल
यानंतर गटविकास अधिकाऱ्यांनी घरकुल योजनेअंतर्गत झालेल्या कामांची पाहणी केली. यात ४२ घरकुले पूर्ण झाल्याचे आढळून आले. तर ५० टक्के सवलतीसह घरपट्टी वसुली ८० टक्क्यांपर्यंत झाल्याचे निदर्शनास आले. पाणीपुरवठा योजनेवरील सौरऊर्जा प्रकल्पाची पाहणी केल्यानंतर शून्य वीजबिल येत असल्यामुळे ग्रामपंचायतीच्या कार्यपद्धतीचे विशेष कौतुक करण्यात आले. याशिवाय स्मशानभूमी सुशोभीकरण आणि सौरदिव्यांचीही पाहणी करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com