“फॉर्म भरला असता तर काहीतरी मिळालंच असतं!”
उमेदवारीपेक्षा माघारीचाच भाव तेजीत
पालिका निवडणुकीत सौदेबाजीच्या राजकारणाची चर्चा
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ३ ः पालिका निवडणुकांचा रणसंग्राम सुरू होण्याआधीच अनेक प्रभागांमध्ये उमेदवारांनी शरणागती स्वीकारत माघार घेतल्याचे चित्र दिसत आहे. या माघारीमागे राजकीय समजुतीपेक्षा ‘सेटलमेंट पॉलिटिक्स’ असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या घडामोडींमुळे केवळ राजकीय पदाधिकारीच नव्हे, तर गल्लीबोळातील सामान्य कार्यकर्त्याच्या मनात ‘आपणही अर्ज भरला असता तर काहीतरी मिळालंच असतं,’ अशी भावना येऊ लागली आहे. उमेदवारी अर्ज हा निवडणूक लढण्यासाठी नव्हे, तर वाटाघाटींसाठीचे हत्यार ठरत असल्याचा आरोप केला जात आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी दिग्गज उमेदवारांचा बिनविरोध विजय निश्चित झाला आहे. तर काही प्रभागांमध्ये राजकारणाचा कसलाही अनुभव नसलेल्या नवख्या उमेदवारांची लॉटरी लागल्याचे चित्र आहे. ही परिस्थिती थेट संघर्ष टाळण्यासाठी आणि राजकीय गणिते आपल्या बाजूने ठेवण्यासाठी आखलेल्या डावपेचांचा भाग असल्याचे बोलले जात आहे.
पक्षाकडून एबी फॉर्म न मिळाल्याने काही इच्छुकांनी बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र या नाराज बंडोबांना थंड करण्यात सत्ताधारी पक्षाने यश मिळवल्याची चर्चा आहे. एकूणच ही पालिका निवडणूक लोकशाहीचा उत्सव न राहता राजकीय ‘डील’चा खेळ ठरत असल्याची भावना सर्वसामान्यांमध्ये निर्माण झाली आहे. उमेदवारी अर्ज भरणे हे आता संघर्षासाठी नव्हे, तर सौदेबाजीचा डाव बनल्याचा टोला राजकीय जाणकार लगावत आहेत.
लाखोंचा खेळ
राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चेनुसार, सामान्य अपक्ष उमेदवारांना १० ते १५ लाखांत मॅनेज करण्यात आले, तर प्रभावशाली बंडखोरांसाठी ५० ते ७५ लाखांपर्यंतचे आकडे फिरत आहेत. याशिवाय मनसे आणि ठाकरे गटातील काही दिग्गज खेळाडूंनाही निवडणूक रिंगणातून बाहेर काढण्यात भाजप यशस्वी ठरल्याची चर्चा आहे. या नेत्यांना पक्षप्रवेशाचे प्रलोभन, तर पुढील सत्ताकाळात मोठ्या वाट्यांचे आश्वासन दिल्याची माहिती खासगीत सूत्रांकडून दिली जात आहे.
कार्यकर्त्यांची खंत
या सर्व चर्चांमुळे पक्षातील काही पदाधिकारी व कार्यकर्ते, जे यंदा निवडणुकीस इच्छुक होते, मात्र पक्षनिष्ठा किंवा वरिष्ठांच्या मर्जीतल्या उमेदवाराला तिकीट दिल्याने माघार घेतली, ते आता उघडपणे बोलू लागले आहेत. आपणही अपक्ष का असेना अर्ज भरला असता, तर फुल नाही तर फुलाची पाकळी तरी नक्कीच मिळाली असती, अशी खंत ते व्यक्त करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

