श्वानकुळाची शिरगणतीला विरोध
भरत उबाळे : सकाळ वृत्तसेवा
शहापूर, ता. ३ : तालुक्यात दहा वर्षांत भटक्या कुत्र्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. कुत्र्यांचे निर्बीजीकरण न झाल्यामुळे प्रत्येक गावात श्वानकुळाचा सुकाळ झाला आहे. लहान मुले, शालेय विद्यार्थी, वृद्ध व महिलांवर कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ झाली आहे. या हल्ल्यांमुळे अनेक जण गंभीर जखमी होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. त्यात आता गावातील भटक्या कुत्र्यांची शिरगणती करण्याची जबाबदारी थेट शिक्षकांवर टाकल्याने शिक्षक संघटनांनी या निर्णयाला कडाडून विरोध दर्शविला आहे.
स्थानिक जबाबदार यंत्रणा म्हणून ग्रामपंचायतींनी गेल्या काही वर्षांत भटक्या कुत्र्यांच्या वाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ठोस उपाययोजना केल्याचे दिसून येत नाही. परिणामी, अनेक ठिकाणी भटक्या कुत्र्यांच्या टोळ्यांचा वावर नागरिकांसाठी धडकी भरवणारा ठरत आहे. असे असताना, शैक्षणिक संस्थांच्या परिसरात व गावांमध्ये भटक्या कुत्र्यांशी संबंधित प्रकरणांमध्ये मुख्याध्यापकांना नोडल अधिकारी तर सर्वेक्षणासाठी शिक्षकांची नियुक्ती करण्याचे आदेश सरकारने दिल्याने शिक्षक वर्गात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
गावातील भटक्या कुत्र्यांची शिरगणती करण्याची जबाबदारी शिक्षकांवर टाकण्यात आल्याने शिक्षक संघटनांनी याला कडाडून विरोध दर्शविला आहे. सध्या शाळांमध्ये विविध स्पर्धा, घटक चाचण्या, विज्ञान प्रदर्शन तसेच अभ्यासक्रम पूर्ण करण्याची घाई सुरू आहे. याशिवाय दहावी व बारावीच्या पूर्वपरीक्षांची तयारी अंतिम टप्प्यात असताना शिक्षकांना शिक्षणबाह्य कामांमध्ये गुंतविल्यास अध्यापनावर गंभीर परिणाम होईल. त्यामुळे यावर शिक्षकांकडून आक्षेप घेतला जात आहे.
शिक्षकांवर सातत्याने शिक्षणाशी असंबंधित जबाबदाऱ्या लादण्याची प्रवृत्ती अत्यंत गंभीर आहे. अध्यापन, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढवणे हे शिक्षकांचे मुख्य कर्तव्य असताना, त्यांना नोडल अधिकारी, स्वच्छता, सुरक्षा किंवा भटक्या श्वान नियंत्रणासारख्या कामांमध्ये अडकवणे म्हणजे शिक्षण व्यवस्थेलाच कमकुवत करणे होय. स्थानिक स्वराज्य संस्थांची जबाबदारी शिक्षकांवर ढकलणे ही प्रशासनाची पळवाट आहे. त्याची किंमत शिक्षक आणि विद्यार्थ्यांना मोजावी लागत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचा गैरअर्थ लावून शिक्षकांवर शिक्षणबाह्य कामे लादली जात असतील, तर तो प्रकार अमान्य आहे. शिक्षकांचा सन्मान, सुरक्षितता आणि कामाची स्पष्ट मर्यादा लक्षात घेऊन असे आदेश तत्काळ मागे घ्यावेत.
- तानाजी कांबळे, महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटना
वेगवेगळे उपक्रम, ऑनलाइन कामे आणि प्रशासकीय जबाबदाऱ्यांमुळे शिक्षकांना अध्यापनासाठी आधीच मोठी कसरत करावी लागत आहे. शाळेच्या आवारात किंवा गावांमध्ये भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांवर सोपवावी.
- रवींद्र पाटील, शिक्षक
शहापूर तालुक्यात ठिकठिकाणी भटक्या कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

