खालापुरात गौण खनिजांची धोकादायक वाहतूक

खालापुरात गौण खनिजांची धोकादायक वाहतूक

Published on

खालापुरात गौण खनिजांची धोकादायक वाहतूक
विना नंबरप्लेट, ओव्हरलोड डम्परमुळे अपघातांची भीती; कारवाईची मागणी
खालापूर, ता. ३ (बातमीदार) ः खालापूर तालुक्यातून जाणाऱ्या राज्य महामार्ग व राष्ट्रीय महामार्गावर सध्या गौण खनिजांची, म्हणजेच ग्रीट, खडी, माती आणि रेतीची मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू आहे. ही वाहतूक अत्यंत धोकादायक आणि नियमबाह्य पद्धतीने होत असल्याचा आरोप केला जात आहे. विशेष म्हणजे, अनेक डम्पर विना नंबरप्लेट रस्त्यावरून भरधाव वेगात धावत असल्याने पर्यटकांसह स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
खालापूर तालुक्यात औद्योगिक वसाहती, मोठ्या प्रमाणावर सुरू असलेले गृहप्रकल्प, तसेच विविध पायाभूत सुविधा विकासकामांमुळे बांधकामासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची मागणी प्रचंड वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर माती, खडी, रेती व ग्रीटची वाहतूक करणारे डम्पर मोठ्या संख्येने रस्त्यावरून धावत आहेत; मात्र ही वाहतूक बहुतांशी वेळा नियमांचे उल्लंघन करून, परवानगीपेक्षा अधिक माल भरून आणि सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता केली जात असल्याचे आढळून येत आहे. या ओव्हरलोड डम्परमुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खडी व ग्रीट सांडत असून त्यामुळे रस्ते घसरडे बनत आहेत. हवेत उडणारी धूळ व ग्रीटमुळे वाहनचालकांचे दृश्य मर्यादित होत असून अपघातांची शक्यता अनेक पटींनी वाढली आहे. सावरोली-खारपाडा राज्य मार्गावर अशा ओव्हरलोड डम्परची वाहतूक सातत्याने दिसून येत असून स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, काही डम्परचालक मद्यपान करून वाहन चालवत असल्याच्या तक्रारीही समोर आल्या आहेत. भरधाव वेग, बेदरकार वाहन चालवणे आणि ओव्हरलोड वाहतूक यामुळे यापूर्वीही या मार्गावर किरकोळ तसेच गंभीर अपघात घडले आहेत. तरीही संबंधित यंत्रणा या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
..................
बहुतेक डम्परना नंबरप्लेट नसल्यामुळे अपघात झाल्यास संबंधित वाहनाचा माग काढणेही कठीण होत आहे. ही बाब कायद्याच्या दृष्टीने गंभीर असून, अशा बेकायदा डम्परवर तातडीने कारवाई होणे आवश्यक असल्याची मागणी प्रवासी, वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. आरटीओ विभाग आणि वाहतूक पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवून विना नंबरप्लेट, ओव्हरलोड आणि नियमभंग करणाऱ्या डम्परवर कडक दंडात्मक कारवाई करावी, तसेच नियमित तपासणी सुरू करावी, अशी जोरदार मागणी होत आहे, अन्यथा भविष्यात मोठे अपघात होऊन जीवितहानीची शक्यता नाकारता येत नाही, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com