भाजपमध्ये उमेदवारीचा गोंधळ
नवनीत बऱ्हाटे : सकाळ वृत्तसेवा
उल्हासनगर, ता. ३ : उल्हासनगर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये उघड झालेला एबी फॉर्मचा गोंधळ हा कुठल्या राजकीय कटाचा भाग नसून, थेट जिल्हाध्यक्षांच्या हलगर्जीचा परिणाम असल्याचा दावा केला जात आहे. पक्षाची जबाबदारी असलेल्या नेतृत्वाच्या निष्काळजी निर्णयांमुळे एकाच जागेसाठी दोन उमेदवार अधिकृत कागदपत्रांसह रिंगणात उतरल्याने भाजप अडचणीत सापडल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
उल्हासनगर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये निर्माण झालेला उमेदवारीचा गोंधळ हा पक्षांतर्गत समन्वयाचा अभाव आहे. थेट जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया यांच्या हलगर्जीमुळे घडल्याचा गंभीर आरोप आता पक्षातूनच होत आहे. पॅनल क्रमांक १९ मधील ब वॉर्डमध्ये एकाच जागेसाठी दोन उमेदवारांना एबी फॉर्म दिल्याची धक्कादायक बाब समोर आल्याने भाजपच्या उमेदवार निवड प्रक्रियेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या प्रकरणात भाजपकडून बंटी कुर्सिजा यांच्या पत्नी लक्ष्मी कुर्सिजा तसेच टीओकेमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या दिनेश लहरानी यांच्या पत्नी कोमल लहरानी यांना एबी फॉर्म देण्यात आले होते. निवडणूक नियमानुसार जो उमेदवार सर्वप्रथम एबी फॉर्म सादर करतो, तोच पक्षाचा अधिकृत उमेदवार ठरतो. त्या नियमानुसार लक्ष्मी कुर्सिजा यांनी आधी एबी फॉर्म दाखल केल्याने त्यांची अधिकृत उमेदवारी निश्चित झाली होती.
या संपूर्ण प्रकारामुळे भाजपच्या उमेदवार निवड प्रक्रियेची विश्वासार्हता, जिल्हा नेतृत्वाची कार्यक्षमता आणि पक्षातील अंतर्गत समन्वय यावर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहे. या हलगर्जीचा फटका थेट निवडणुकीत बसणार का, याकडे आता सर्व राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
तीन उमेदवार कोमल लहरानीसोबत
जिल्हाध्यक्ष पातळीवरील निष्काळजी आणि समन्वयाच्या अभावामुळे हा विषय चिघळत गेला. दुसरीकडे पॅनल क्रमांक १९ मधील उर्वरित तीन भाजप उमेदवारांनी अधिकृत उमेदवार असलेल्या लक्ष्मी कुर्सिजा यांना डावलत थेट कोमल लहरानी यांना पाठिंबा जाहीर केला. यामुळे भाजपमधील अंतर्गत मतभेद उघडपणे रस्त्यावर आले असून, पक्षशिस्तीचे तीनतेरा वाजल्याचे चित्र दिसून येत आहे.
चुकून एबी फॉर्म दिल्याचे मान्य
या गोंधळावर प्रतिक्रिया देताना जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया यांनी बंटी कुर्सिजा यांना चुकून एबी फॉर्म दिल्याचे मान्य केले. ही चूक लक्षात येताच एबी फॉर्म परत देण्यास सांगितले; मात्र त्यांनी मोबाईल बंद करून संपर्क तोडल्यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेल्याचा दावा वधारिया यांनी केला. हा खुलासा म्हणजे जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा आता भाजपच्या अंतर्गत वर्तुळात रंगू लागली आहे.
चार प्रभागांत गोंधळ
विशेष म्हणजे, या आधीही पॅनल क्रमांक १ मध्ये शिवसेना (शिंदे गट)मधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या बाळा श्रीखंडे यांच्या बाबतीतही असाच प्रकार घडल्याचे समोर आले होते. त्यामुळे चूक अपवादात्मक नसून, हीच भाजपची पद्धत आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. उल्हासनगरमधील एकूण चार प्रभागांत असा गोंधळ झाला आहे.
पदाधिकाऱ्यांचा आरोप
आधी इतर पक्षांतील मजबूत आणि प्रभावी उमेदवारांना भाजपमध्ये प्रवेश द्यायचा आणि नंतर त्यांच्याच विरोधात भाजपमधील जुन्या उमेदवारांना एबी फॉर्म देऊन आधीच अर्ज दाखल करण्यास प्रवृत्त करायचे अशी खेळी जिल्हा नेतृत्वाकडून आखली जात असल्याचा आरोप आता उघडपणे होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

