हुतात्म्यांच्या स्मारकाचा कर्जत नगरपरिषद प्रशासनाला विसर
हुतात्म्यांच्या स्मारकाचा कर्जत नगर परिषद प्रशासनाला विसर
स्मृतिदिनालाही अस्वच्छता; नागरिकांमध्ये तीव्र नाराजी
कर्जत, ता. ३ (बातमीदार) : भारतीय स्वातंत्र्यलढ्यात आपल्या प्राणांची आहुती देणारे क्रांतिकारक हुतात्मा भाई कोतवाल व हुतात्मा हिराजी पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारलेल्या स्मारकाकडे कर्जत नगर परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. २ जानेवारी १९४३ला देशासाठी बलिदान दिलेल्या या क्रांतिवीरांच्या स्मृतिदिनीही स्मारक परिसर अस्वच्छ, गवताने भरलेला व कचऱ्याने व्यापलेला आढळून आल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
कर्जत नगर परिषद हद्दीतील आमराई येथील क्रीडानगरी परिसरात उभारण्यात आलेल्या या स्मारकात ‘व्यर्थ न हो बलिदान’ या संदेशाखाली हुतात्मा भाई कोतवाल व हिराजी पाटील यांची शिल्पे उभारण्यात आली आहेत. याच ठिकाणी कर्जत तालुक्यातील सुमारे ४० स्वातंत्र्यसैनिकांची नावे कोरलेली असून बलिदानाचे प्रतीक म्हणून मशालही उभारण्यात आली आहे; मात्र पवित्र स्मृतिदिनाच्या दिवशी या स्मारक परिसरात वाढलेले गवत, साचलेला कचरा आणि एकूणच दयनीय अवस्था पाहून हुतात्माप्रेमींना वेदना झाल्या.
कर्जत तालुक्यासह मुरबाड व परिसरात विविध ठिकाणी या क्रांतिवीरांना अभिवादन केले जात असताना, नगर परिषद प्रशासनाच्या उदासीनतेमुळे कर्जत शहरातील मुख्य स्मारक उपेक्षित राहिल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. किमान स्मृतिदिनाच्या दिवशी तरी स्वच्छता व देखभाल व्हावी, अशी रास्त अपेक्षा नागरिकांनी व्यक्त करीत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
चौकट
आजची उदासीनता
साधारण दहा वर्षांपूर्वी या स्मारक ठिकाणी ऑगस्ट क्रांतिदिन, हुतात्मा स्मृतिदिन, प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्यदिनानिमित्त नियमित स्वच्छता, कार्यक्रम व अभिवादन होत असे; मात्र अलीकडे नगर परिषद प्रशासनाची ढिसाळ कार्यपद्धती चर्चेचा विषय ठरत आहे.
चौकट
नागरिकांचा सवाल
नगर परिषद कर्मचारी व अधिकारी आपली जबाबदारी विसरत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. अनेक ठिकाणी सुशोभीकरणाच्या नावाखाली उभारलेली शिल्पेही देखभालीअभावी विद्रूप अवस्थेत दिसत आहेत. जपता येत नसेल तर उभारायचे कशासाठी, असा थेट सवाल करीत हुतात्मा स्मारकांची देखभाल गांभीर्याने घेण्याची जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

