''एआय'' तंत्रज्ञानाने क्षयरोगावर उपचार

''एआय'' तंत्रज्ञानाने क्षयरोगावर उपचार

Published on

‘एआय’ तंत्रज्ञानाने क्षयरोगावर उपचार
ठाण्यात १४ हजार नागरिकांचे एक्सरे; २३ रुग्ण बाधित
ठाणे, ता. ३ : भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाच्या ‘राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन’ कार्यक्रमांतर्गत ठाणे जिल्ह्यात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर सुरू झाला आहे. एआय आधारित हँड हेल्ड एक्सरे मशीनच्या साहाय्याने जिल्ह्यात १४ हजार ८० नागरिकांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी २३ जणांना क्षयरोगाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. पारंपारिक तपासणीसोबतच आता एआयआधारित एक्सरे मशीन गावोगावी नेऊन अतिजोखमीच्या गटातील लोकांची तपासणी केली जात आहे. या मशीनमुळे जागीच निकाल मिळत असल्याने संशयित रुग्णांचे निदान करणे अधिक सोपे झाले आहे.

क्षयरोगमुक्त भारत अभियान तसेच मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानअंतर्गत जिल्ह्यातील अतिजोखमीच्या लोकसंख्येची क्षयरोगासाठी तपासणी मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे. या शिबिरांद्वारे अतिजोखमीच्या लोकांची तत्काळ तपासणी करून संभाव्य रुग्णांची ओळख पटविण्यात येत आहे. आकडेवारीवरून जिल्ह्यातील अतिजोखमीच्या भागांमध्ये लक्ष केंद्रित करून तपासणी व उपचार अधिक प्रभावीपणे राबविले जात असल्याचे स्पष्ट होते. या कालावधीत एआय हँड हेल्ड एक्स-रे मशीनच्या माध्यमातून जिल्ह्यात १४ हजार ८० व्यक्तींची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी दोन हजार ४९३ व्यक्ती संशयित आढळून आल्या आहेत. या संशयितांपैकी एक हजार ९३७ व्यक्तींची थुंकी नमुना तपासणी करण्यात आली असून, २३ व्यक्ती क्षयरोगबाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात थुंकी नमुना तपासणीसह एआयआधारित हँड हेल्ड एक्स-रे मशीन अत्यंत उपयुक्त ठरत असून, संशयित रुग्णांची तत्काळ तपासणी करून त्यांना त्वरित उपचारांखाली आणणे शक्य होत आहे.

भिवंडी आणि मुरबाडमध्ये सर्वाधिक रुग्ण
जिल्ह्यातील बदलापूर, भिवंडी, कल्याण, मुरबाड आणि शहापूर या तालुक्यांमध्ये ही मोहीम राबवण्यात आली. यामध्ये भिवंडी आणि मुरबाड तालुक्यांत क्षयरोगाचे रुग्ण अधिक प्रमाणात आढळून आले आहेत. प्रशासनाने आता या अतिजोखमीच्या भागांवर लक्ष केंद्रित केले आहे.

रुग्णांना मिळणार पूर्ण पाठबळ
आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे, की क्षयरोग हा पूर्णपणे बरा होणारा आजार आहे. बाधित रुग्णांना सकस आहारासाठी निक्षय पोषण योजनेद्वारे दरमहा आर्थिक साहाय्य दिले जाते. शासकीय रुग्णालयांत अत्याधुनिक चाचण्या आणि औषधोपचार पूर्णपणे मोफत आहेत. रुग्ण पूर्णपणे बरा होईपर्यंत आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत पाठपुरावा केला जातो. ज्या नागरिकांना दीर्घकाळ खोकला, ताप, वजन घटणे किंवा रात्री घाम येणे, अशी लक्षणे जाणवत असतील, त्यांनी त्वरित जवळच्या शासकीय आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करून घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.

तपासणीचा वर्षभराचा आढावा (जानेवारी ते डिसेंबर २०२५)
एकूण एक्सरे तपासणी : १४,०८० नागरिक
संशयित रुग्ण : २,४९३
थुंकी नमुना तपासणी : १,९३७ व्यक्ती
क्षयरोगबाधित रुग्ण : २३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com